पगार मिळत नसल्याने मोनोरेल कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-monorail-001

सामना प्रतिनिधी, मुंबई

आर्थिक डबघाईत असलेल्या मोनोरेलचे व्यवस्थापन ‘एमएमआरडीए’ने आपल्या ताब्यात घेतल्यानंतर सर्व काही सुरळीत होणार अशी आशा असताना आता मोनोच्या कर्मचाऱ्यांनी पगार वेळेवर मिळत नसल्याचे कारण सांगत येत्या 11 जानेवारीपासून ‘काम बंद’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

चेंबूर ते वडाळा अशा 8 कि.मी.च्या टप्प्यात सध्या मोनोरेलची सेवा सुरू आहे. मोनोचा दुसरा टप्पा लवकर सुरू करण्यात आलेले अपयश तसेच नादुरुस्त गाड्यांची पार्टस् खरेदी व नव्या गाड्या खरेदीचे टेंडर काढण्यास लावलेला उशीर यामुळे ‘एमएमआरडीए’ने मोनोचे व्यवस्थापन हाताळणाऱ्या स्कॉमी इंजिनीअरिंग कंपनीला डच्चू दिला आहे.

‘स्कॉमी इंजिनीअरिंग’ या मलेशियन कंपनीची हकालपट्टी करून ‘एमएमआरडीए’ने 14 डिसेंबर रोजी मोनोचे व्यवस्थापन आणि परिचालन आपल्या ताब्यात घेतले. स्कॉमी इंजिनीअरिंगने कर्मचाऱ्यांचे पगार आणि देणी थकवली आहेत. याबाबत आधीच्या कर्मचाऱ्यांनी ‘एमएमआरडीए’ला नव्या नेमणुकीबाबतच्या अटी व शर्ती आणि पगार व देणी याबद्दल लेखी आश्वासन देण्याची मागणी केल्याचे समजते.