फडणवीस सरकार सर्वच बाबतीत अपयशी…अशोक चव्हाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

काँग्रेस विरोधासाठी विरोध कधीच करत नाही, राज्यात सत्तेवर येताना भाजपाने जी आश्‍वासने दिली ती सर्व फोल ठरले आहे. सरकारने फक्त घोषणा केल्या, शेतकर्‍यांचे, बेरोजगारांचे, सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सुटू शकले नाहीत. हे सरकार डिलेव्हरी शून्य असून कोणतीच पूर्तत सरकाकडून झाली नाही हे फडणवीस सरकारचे अपयश आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज नगर येथे पत्रकारांशी बोलताना केली. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून किती भ्रष्टाचार झाला हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवत आहोत पण आगामी काळामध्ये निवडणुकीपूर्वी राज्यामध्ये किमान 50 सभा आम्ही घेऊन सरकारचे अपयश हे जनतेसमोर मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले लोकसभेच्या निवडणुकीबाबत आघाडीची बोलणी चालू आहे मात्र कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ते नगर येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार भाऊसाहेब कांबळे, विनायक देशमुख, उल्हास पाटील, हेमंत ओगले, दिप चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी चव्हाण म्हणाले की, राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती भयंकर आहे. सरकार मात्र उपाययोजना करायला तयार नाहीत. सरकारने फक्त आत्तापर्यंत घोषणाबाजी केली आहे. टँकरमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली, खड्डे मुक्त होईल असे सांगितले, परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही. आज सरकारवर पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. तर एकीकडे पैसा नसल्यामुळे दुष्काळावर मात केली जात नाही फक्त घोषणा केल्या जातात. घोषणा केल्या म्हणजे दुष्काळा हटला असे होत नाही, असेही चव्हाण यांनी स्पष्ट म्हटले आहे.

राज्यात सरकार सत्तेवर येताना जी आश्‍वासने दिली ती सर्व फोल ठरली आहेत. शेतकर्‍यांचे प्रश्‍न, कर्जमाफी, बेरोजगारीचा प्रश्‍न सोडवण्यावर सरकार अपयशी ठरले आहे. शेतकर्‍यांच्या मालाला आधारभूत किंमत देऊ असे जाहीर केले मात्र ती दिली नाही. कर्जमाफीची रक्कम अद्याप पर्यंत मिळू शकली नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर हे रक्कम देतीलही आरक्षणाचा विषय सुद्धा सुटू शकला नाही. आम्ही मुस्लीमांना आरक्षण देऊ असा निर्णय घेतला होता, मात्र यांनी आतापर्यंत कोणती आरक्षण दिले नाही. आमचे सरकार असताना आम्ही विकास कामांचे नारळ फोडले मात्र यांनी कोणतेच काम पूर्णत्वाला नेली नाही. साधे शिवस्मारकाचा विषय सुद्धा यांनी केला नाही, यांनी फक्त उद्घाटन केले तसेच त्याचे काय झाले ? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

भाजप सरकारच्या काळातील आम्ही राफेल घोटाळा सुद्धा बाहेर काढला आहे. त्यातील भ्रष्टाचार सुद्धा उघड केला आहे. जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही जागोजागी जनजागृती करण्याचे काम करत आहोत. उद्या आम्ही कोकण मध्ये या यात्रेला सुरुवात करणार आहोत. आम्ही जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून सर्व ठिकाणी पोहोचलो असे नाही, मात्र आता ज्या ठिकाणी आम्ही पोहोचलो नाही अशा ठिकाणी आम्ही आता पंन्नास सभांचे आयोजन केले आहे. तसेच या माध्यमातून सरकारचे अपयश व त्यांनी केलेल्या घोषणा प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली की नाही याचा या माध्यमातून आम्ही पर्दाफाश करणार असल्याचेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

देशामध्ये आता परिस्थिती बदलत चाललेली आहे, नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला तीन राज्यांमध्ये सत्ता मिळालेले आहेत. त्या राज्यात भाजपाला यश मिळू शकलेले नाही असे ते म्हणाले. लोकसभा असो आता विधानसभा निवडणुकीची तयारी आम्ही सुरू केली आहे, ज्या भागामध्ये उमेदवार निश्‍चित करायचे आहेत त्या त्या भागातील जिल्ह्यातील ठराव सुद्धा आमच्याकडे पाठवा असे सांगून यापुढील काळामध्ये जागा या दिल्ली, मुंबई येथून ठरणार नाही तर स्थानिक पातळीवर जो काही प्रस्ताव येईल त्यावरून जागा निश्‍चित केले जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आमच्या निवड मंडळाची बैठक येत्या 28 किंवा 29 जानेवारी रोजी होणार असल्याचेही अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी समवेत आमची बैठक झालेली आहे. इतर मित्र पक्षांना सुद्धा आम्हाला जागा द्यायचे आहेत प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत आघाडी व्हावी अशी आमची सुद्धा धारणा आहे. पण आमचा विषय एमआयएम मुळे थांबला होता मात्र एमआयएमनी आम्ही जागा लढवणार नाही असे आता सांगितले आहे प्रकाश आंबेडकर यांनी जागे संदर्भात केलेली मागणी ही काही चुकीची नाही, मात्र आम्हाला जागा वाटप करताना राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य समविचारी पक्षांना सुद्धा जागा द्यायच्या आहे या सर्व बाबींचा विचार आम्ही निश्‍चितपणे जागा वाटप करणार आहोत. ज्या ठिकाणी आमचा उमेदवार विजयी होईल तेथे आम्ही उमेदवार देणार व जिथे मित्र पक्षाचे उमेदवार विजयी होतील तेथे त्यांना जागा दिली जाईल असे सूत्र ठेवले आहे. जागांची अदलाबदल ही केली पाहिजे, असे आमचे मत आहे. नगर यांच्याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही ती जागा प्रायोरिटीवर ठेवली आहे असे ते म्हणाले. सुजय विखे यांनी केलेल्या वक्तव्यावर मी त्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही पण त्यांच्याशी बोलून चर्चाही करु असे ही त्यांनी स्पष्ट केले.

इंदू मिलला आम्ही जागा दिली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात या कामाला गती मिळाली मात्र आता जे विरोधक बोलत आहेत त्यांचे सर्व ओरोप खोटे आहेत. यांनी कोणतीच कामे पुर्णत्वाला नेली नाहीत असे एक ना अनेक उदारहणे आहेत. कृती करायचीच नाही अशी यांची भुमीका असल्याचा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला.

जनलोकपालासाठी अण्णांनी ज्या मागण्या केल्या, लोकपाल लोकयुक्त नियुक्त झाले पाहीले आमची भूमिका आहे. या बाबत आम्ही लोकसभेत बोललेही आहोत. अण्णांच्या भूमिकेला आमचा पाठींबा आहे असे चव्हाण यांनी म्हंटले आहे. राज्यात डान्सबार बंदीच्या निर्णया संदर्भात जी बाजू राज्य सरकारने मांडायला पाहिजे होती ती मांडली नाही, आर आर पाटील असताना डान्सबार बद्दल कडक भूमिका घेतली होती. मात्र या सरकारने भूमीका न घेतल्यामुळेच डान्सबारचा विषय सुरु झाला आहे अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.