‘गोव्यातील राष्ट्रीय अधिवेशनातून शिक्षकांच्या ज्वलंत प्रश्नांच्या सोडवणुकीचा विश्वास’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

शिक्षकांकडून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. शिक्षक वर्ग आपल्या जबाबदार्‍या समर्थपणे पेलत असून आता सरकारनेही शिक्षकांचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची, ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, बदलीचे धोरण बदलून शिक्षकांच्या गैरसोयीच्या बदल्या रद्द करून तालुक्यातच बदल्या व्हाव्यात आदी महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक गोवा येथे होणार्‍या राष्ट्रीय शिक्षण परिषद व महाअधिवेशनातून होणे अपेक्षित आहे. यासाठी सर्व शिक्षकांनी एकजूट दाखवत या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव पाटील यांनी केले.

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्यावतीने गोव्यातील पणजीमध्ये 4 ते 10 फेब्रुवारीदरम्यान राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी नगरमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची महासभा घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना शिवाजीराव पाटील बोलत होते. अधिवेशनात 8 फेब्रुवारी रोजी शिक्षण परिषद होणार असून यात डॉ.विजय भाटकर, डॉ.रघुनाथ माशेलकर, डॉ.भालचंद्र नेमाडे, डॉ.एन.बी.पाटील आदी विचारवंत शिक्षकांना आधुनिक आणि सक्षम होण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. तर 9 फेब्रुवारीला खुले अधिवेशन होईल. यावेळी केंद्रीय मनुष्य़बळविकास मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आदी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात शिक्षकांचे ज्वलंत व प्रलंबित प्रश्न केंद्र व राज्य सरकारने तातडीने सोडवावेत, अशी आग्रही मागणी करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, वीस पटाच्या आतील शाळा बंद करू नये, नगरपालिका, महानगरपालिका शाळातील शिक्षकांचा पगार 100 टक्के शासकीय अनुदानातून झाला पाहिजे, एमएससीआयटीला 2020 पर्यंत मुदत वाढ मिळावी, विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी मिळावी, गुणवत्ता वाढीचा उपक्रम सर्व राज्यात एकच असावा, प्राथमिक शाळांना सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, शाळांची ऑनलाईन माहिती भरण्यासाठी प्रत्येक केंद्र शाळेत डाटा ऑपरेटरची नेमणुक करावी आदी मागण्यांबाबत या महासभेत चर्चा करून राष्ट्रीय अधिवेशनासाठी नगरसह संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकाधिक शिक्षक उपस्थित राहतील यादृष्टीने नियोजन करण्यात आले.