
सामना प्रतिनिधी । भिगवण
करमाळा तालुक्यातील उजनीकाठचे गाव डिकसळ पूल येथील परप्रांतीय मच्छीमार हटाव, उजनी सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध ,उजनी जलाशयाचा मासेमारीचा ठेका कोणत्याही प्रकारे काढण्यात येऊ नये,आदी मागण्यांसाठी मच्छिमार संघटनेच्या वतीने हजारो मच्छिमार महिला नागरीकांच्या उपस्थितीत जलसमाधी आंदोलन करण्यात आले. याबाबत 10 दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दूरध्वनीवरून जलसंपदा अधिक्षक अभियंता साळे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत शितोळे म्हणाले, अनेक वर्षांपासून उजनी जलाशयातील मच्छिमारांवर अन्याय होत आहे. 10 हजार हेक्टरवर सौर ऊर्जाचा प्रकल्प झाला तर मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. यावेळी प्रहार संघटनेचे अतुल खुपसे पाटील म्हणाले, शासन नियमानुसार परप्रांतीय मच्छिमारांना येथे येता येत नाही तरी संबंधीत अधिकाऱ्यानी ताबडतोब याची दखल घ्यावी, अन्यथा 15 दिवसात परप्रांतीय मच्छीमारांना योग्य धडा शिकवला जाईल असा इशारा त्यांनी दिला. यानंतर जलसमाधी घेण्यासाठी मच्छीमारांनी नदीकडे धाव घेतली, यावेळी शेकडो महिलाही उपस्थित होत्या. करमाळा पोलिसांनी हस्तक्षेप करत भीमा उपसा सिंचन अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दुरध्वनीवरून याबाबत माहिती दिली. आंदोलनकर्त्यांना आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. मात्र ठोस आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, 10 दिवसांत या मागण्यांवर विचार करून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत शितोळे, प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अतुल खुपसे पाटील,मच्छीमार संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सिताराम नगरे आदीसह मोठ्या संख्येने पदाधिकारी मच्छिमार उपस्थित होते.

























































