#NZvsIND महिलांचीही विजयी सलामी, न्यूझीलंडला 9 विकेट्सने चारली धूळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बुधवारी पुरुष क्रिकेट संघाने न्यूझीलंडला धूळ चारल्यानंतर गुरुवारी महिलांनीही विजयी सलामी दिली. गुरुवारपासून सुरू झालेल्या तीन सामन्यांच्या एक दिवसीय मालिकेच्या शुभारंभाच्या सामन्यात हिंदुस्थानने न्यूझीलंडचा 9 विकेट्सने दणदणीत पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. सलामीवीर स्मृती मंधांना आणि जेमी रॉड्रिगज यांनी केलेल्या 190 धावांच्या भागीदारीच्या जोरावर हिंदुस्थानने मोठा विजय मिळवला. स्मृती मंधानाने शतकी खेळी करत 105 धावा केल्या, तर रॉड्रिगजने नाबाद 81 धावांची खेळी केली. मंधानाला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला.

न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 193 धावांचा पाठलाग करताना स्मृती मंधांना आणि रॉड्रिगजने दमदार सलामी दिली. मंधाना आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत खेळताना दिसली. न्यूझीलंडच्या प्रत्येक गोलंदाजाची गोलंदाजी मंधानाने फोडून काढत शतक झळकावले. हिंदुस्थानला विजयासाठी 3 धावांची आवश्यकता असताना मंधाना 105 धावांवर बाद झाली. मंधानाने 104 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने आपली खेळी सजवली. दुसरीकडे रॉड्रिगजने शेवटपर्यंत नाबाद राहात हिंदुस्थानला मोठा विजय मिळवून दिला. रॉड्रिगजने 94 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 81 धावा चोपल्या.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 48.4 षटकात 192 धावांवर आटोपला. हिंदुस्थानच्या एकता बिष्ट आणि पूनम यादव या फिरकी जोडगोळीपुढे न्यूझीलंडच्या फलंदांजाचा टिकाव लागला नाही. न्यूझीलंडकडून सुजी बेट्सने 36 आणि सोफी डेव्हीनेने 28 धावांचे खेळी केली. तर एमी सेटरव्हाईटने 31 धावांचे योगदान दिले. यादव आणि बिष्टने प्रत्येकी तीन बळी घेतले, तर दिप्ती शर्माने 2 व शिखा पांडेला एक बळी मिळाला.