
सामना प्रतिनिधी, फैजपूर
हॅकर हे खोटारडे असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवू नये असे पक्षाने सांगितले, मात्र माझ्या बाबतीतही हॅकर मनीष भंगाळे याने माझे दाऊदसोबत संभाषण असल्याचे सांगितले होते व त्याच्या बोलण्यावर त्यावेळी विश्वास कसा ठेवण्यात आला, असा प्रश्न भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी केला.
फैजपूर येथे पत्रकार संघाच्या वातानुकूलित पत्रकार परिषद हॉलच्या उद्घाटनप्रसंगी आमदार खडसे बोलत होते. आमदार खडसे म्हणाले की, हॅकर मनीष भंगाळेने माझ्यावर जे आरोप केले हे कसे खरे मानण्यात आले. त्यानंतर झालेल्या मीडिया ट्रायलमुळे मला माझ्या पदाचा राजीनामा द्यावा लागला व मीडिया ट्रायलमुळे एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली.
अमेरिकेतील हॅकर सय्यद शुजा याने लंडनमध्ये पत्रकार परिषद घेऊन अनेक दावे केले. त्यामुळे हिंदुस्थानात खळबळ उडाली होती. त्यानंतर पक्षाने हॅकर हे खोटारडे असल्याने त्यांच्याकर विश्वास ठेवू नये अशी भूमिका भाजपने मांडली होती. या भूमिकेचा आधार घेत खडसे यांनी फैजपूर येथे पुन्हा पक्षाला लक्ष्य करीत हॅकर जर खोटारडे असतात तर मग माझ्या बाबतीतही हॅकर मनीष भंगाळे याने माझ्यावर दाऊदसोबत संभाषणाचा दावा केला होता मग त्याच्यावर का विश्वास ठेवण्यात आला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आमदार एकनाथ खडसे व अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यात दूरध्वनीद्वारे संभाषण झाल्याचा व त्याचे कॉल डिटेल्स आपल्याकडे असल्याचा दावा हॅकर मनीष भंगाळेने केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाअंती खडसे यांना क्लीन चिट दिली होती.

























































