
सामना ऑनलाईन । रायपूर
लोकसभा निवडणुकीत विजयी होऊन काँग्रेस सत्तेत आल्यास देशातील प्रत्येक गरीबाला किमान उत्पन्नाची हमी देणारी योजना सुरू करण्यात येईल, अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
छत्तीसगड येथे रायपूर येथील शेतकरी आभार मेळाव्यात राहुल गांधींनी हे आश्वासन दिले आहे. काँग्रेस पक्षाच्या सत्ताकाळात मनरेगा योजना सुरू करून 100 दिवसांच्या रोजगाराची हमी दिली. माहिती अधिकार, भोजन अधिकार या योजना सुरू केल्या. त्याच धर्तीवर देशातील गरिबी दूर करण्यासाठी आणि भुकबळी थांबविण्याकरिता प्रत्येक गरीबाला किमान उत्पन्नाची हमी देण्यात येईल. 2019ला सत्तेवर आल्यास ही योजना सुरू करण्यात येईल, असे राहुल गांधी यांनी जाहीर केले.
दोन हिंदुस्थान बनविण्याचा भाजपचा डाव
या वेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. दोन हिंदुस्थान बनविण्याचा पंतप्रधान मोदी आणि भाजपचा डाव आहे. एक उद्योपती मित्रांचा आणि दुसरा गरीब शेतकऱयांचा. शेतकऱयांचे कर्ज माफ करण्यासाठी पंतप्रधानांकडे सहा हजार कोटी नाहीत. मात्र उद्योगपती मित्रांचे हजारो कोटींचे कर्ज माफ करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आहेत. गरीबाने अर्धी भाकरी खाऊन रहावे आणि अनिल अंबानींनी जास्त पैसा कमवावा, अशी मोदी सरकारची नियत आहे. सरकारचे हे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
‘राफेल’चे स्फोटक रहस्य पर्रीकरांकडे
‘राफेल’चे विस्फोटक रहस्य गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याजवळ आहे. या रहस्यांच्या आधारे ते पंतप्रधान मोदींना नियंत्रणात ठेवतात, असा हल्लाबोल राहुल गांधींनी ‘ट्विट’द्वारे केला आहे. ‘राफेल’बाबतची ऑडिओ टेप जारी होऊन 30 दिवस झाले तरी सरकारने चौकशी केलेली नाही. गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणेंवरही कारवाई केली नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.























































