जय श्रीराम! 21 फेब्रुवारीपासून राम मंदिर निर्माणाला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अयोध्येतील राम मंदिर निर्माण मुद्द्यावर साधू-संत आक्रमक झाले आहेत. प्रयागराजमध्ये द्वारकापीठचे शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी बोलावलेल्या धर्मसंसदेमध्ये अयोध्येत राम मंदिरासाठीचा प्रस्ताव पास करण्यात आला आहे. पुढील महिन्यात सर्व साधू-संत अयोध्येकडे कूच करणार असून मंदिर निर्माणासाठी शिलान्यास करण्यात येणार आहे. 21 फेब्रुवारी 2019 पासून राम मंदिर निर्माणाला सुरुवात होणार आहे.

या धर्मसंसदेत बोलताना शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती म्हणाले की, ‘अयोध्येमध्ये मशिद नाही तर मंदिर तोडण्यात आले होते. तसेच रामलल्लाची जन्मभूमी सोडून सरकार दुसरीकडे मंदिर निर्माणाचा डाव मोदी सरकार रचत आहे. नरसिंह राव म्हणाले होते की ज्यांच्याकडून जमिन घेतली त्यांना ती परत दिली जाणार नाही आणि आम्ही अयोध्येत जाऊन राम मंदिरचा शिलान्यास करणार आहोत.’

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी गुरुवारी धर्मसंसदेचे आयोजन केले होते. या धर्मसंसदेसाठी विविध आखाड्याचे साधू-संत आले होते. याच वेळी अयोध्येतील राम मंदिरासारख्या गहन मुद्द्यावर चर्चा केल्यानंतर राम मंदिर निर्माणासाठी प्रस्ताव मांडण्यात आला आणि तो पास करण्यात आला. 21 फेब्रुवारीला साधू-संत अयोध्येत जाऊन राम मंदिराचा शिलान्यास करणार, असा निर्णय धर्मसंसदेत घेण्यात आला.