कार धुवायला म्हणून आला आणि इनोव्हा घेऊन पळाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
car-thief

सामना ऑनलाईन । नवी मुंबई

बदली नोकर असल्याचे सांगत मालकीणीकडून कारची चावी घेऊन एक भामटा महागडी इनोव्हा गाडी घेऊन पसार झाल्याची घटना रविवारी नवी मुंबईतील नेरुळ येथे घडली आहे. पोलीस या भामट्याचा शोध घेत आहेत.

रविवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास नेरुळ येथील पाम बीच रेसिडेन्सी टॉवरमधील एका फ्लॅटची बेल वाजली. घरमालकीणीने दरवाजा उघडताच समोरच्या व्यक्तीने तिला त्यांची कार धुणारा रोहीत नावाचा नोकर अचानक गावी गेल्याचे व बदली नोकर म्हणून त्याने आपल्याला कार धुवायचे काम दिल्याचे महिलेला सांगितले. तसेच कार आतून स्वच्छ करावयाची असल्याने त्याने महिलेकडे गाडीची चावी मागितली. महिलेने कुठलीही चौकशी न करता त्याला चावी दिली. त्यानंतर बराचवेळ झाला तरी संबंधित व्यक्ती चावी परत देण्यास आलीच नाही. यामुळे महिलेने याबद्दल पतीला सांगितले. त्यानंतर कार चोरीला गेल्याचे समोर आले.

दरम्यान बिल्डींगच्या प्रवेशद्वारावर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये चोरट्याचा व्हिडीओ कैद झाला असून त्यात तो गेटबाहेर गाडी नेताना दिसत आहे. सीसीटीव्हीत त्याचा फोटो स्पष्ट दिसल्याने त्याला लवकरच पकडले जाईल असे सहाय्यक पोलीस निरिक्षक मनीष कोल्हटकर यांनी सांगितले आहे.