
सामना ऑनलाईन । सॅन फ्रान्सिस्को
ऑक्टोबर ते डिसेंबर 2018 या तिमाहीत फेसबुकला तब्बल 48 हजार 848 कोटी (688 कोटी डॉलर) रुपयांचा नफा झाला आहे. बुधवारी फेसबुकने मागील तिमाहीतील आर्थिक उलाढालीची आकडेवारी जाहीर केली. फेसबुकला आतापर्यंत झालेला हा सर्वाधिक नफा आहे.
2017 च्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत 2018 च्या शेवटच्या तिमाहीत फेसबुकच्या नफ्यात 61 टक्क्यांची वाढ झाली आहे. फेसबुकचा महसूलही 30 टक्क्यांनी वाढला आहे. 1.20 लाख कोटी रुपयांचा महसूल यंदा मिळाला असून यात जाहिरातीद्वारे मिळणाऱया महसुलाचा सर्वाधिक म्हणजेच 93 टक्के वाटा आहे.
फेसबुकच्या शेअर्समध्ये तेजी
अमेरिकी शेअर बाजारात फेसबुकच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. बुधवारी फेसबुकच्या शेअर्समध्ये 12 टक्क्यांची वाढ दिसून आली. त्यामुळे फेसबुकचे मार्केट कॅपमध्येही 3.75 लाख कोटी रुपयांचा नफा दिसून आला. हा नफा 29.42 लाख कोटी रुपयांवरून 33.17 लाख कोटी रुपयांवर गेला आहे.
– फेसबुकच्या दैनंदिन आणि मासिक ऑक्टिव्ह युजर्समध्येही 8.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
– डिसेंबर 2018 तिमाहीत दैनंदिन ऑक्टिव्ह युजर्स 152 कोटी आणि मासिक ऑक्टिव्ह युजर्सची संख्या 232 कोटी इतकी होती.
– मासिक ऑक्टिव्ह युजर्सच्या संख्येतील वाढ आशिया पॅसिफिकमध्ये सर्वाधिक दिसून आली आहे.
डाटा लीक प्रकरणाचा परिणाम नाही
युजर्सच्या डाटा लीक प्रकरणाचा फेसबुकच्या नफ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. युजर्सची संख्या आणि महसूल वाढल्याने फेसबुक कंपनी सध्या नफ्यात आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले, ‘यंदा कंपनी प्रॉडक्ट डेव्हलपमेंट’वर भर देणार आहे. मेसेजिंग, पेमेंट, व्हिडीओ आणि हार्डवेअरमध्ये युजर्सना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आहे.’

























































