लोकसभा निवडणूक: मतदान प्रक्रियेसाठी १४ कक्ष स्थापन, ३० कर्मचारी नियुक्त, कामकाज सुरू झाले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची राजकीय गणिते सुरू असताना प्रशासनाने मात्र लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजविला आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि सुव्यस्थित पार पाडण्यासाठी तब्बल १४ कक्ष स्थापन केले आहेत. या सर्व कक्षांचे प्रमुख म्हणून अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी कक्षप्रमुख म्हणून जबाबदारी देताच जिल्हा परिषदेचे मुख्य व लेखा अधिकारी अप्पासाहेब चाटे यांनी ३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांना तसे वॉरंट बजावण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीचे काऊंट डाऊन सुरू झाले आहे. दोन महिन्यांत या निवडणुकीचा बार उडणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची राजकीय गणिते सुरू झाली आहेत. असे असले तरी निवडणूक आयोगाकडून अद्याप कुठलीही घोषणा झालेली नाही. प्रशासनाने या निवडणुकीसाठी तयारी सुरू केलेली असून, मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या कामापासून याचा प्रारंभ करण्यात आला आहे. त्या पाठोपाठ यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचेही आकडेमोड करण्यात आलेली असून, जिल्ह्यातून सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचारी या कामासाठी घेण्यासाठी कारवाई सुरू झालेली आहे. या पाठोपाठ आता जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान आणि मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडे जबाबदारी देत १४ कक्ष स्थापन केले आहे.

यामध्ये महसूल उपायुक्त मंजूषा मुथा यांच्याकडे निवडणूक कामासाठी कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठीच्या कक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी रिता मैत्रवार यांच्याकडे ईव्हीएम मशीन व्यवस्थापन, प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांच्याकडे वाहतूक व्यवस्था, उपजिल्हाधिकारी एच. व्ही. आरगुंडे यांच्याकडे मतमोजणी प्रशिक्षण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांच्याकडे मतदान साहित्य वितरण, निवासी उपजिल्हाधिकारी आचारसंहिता, मीडिया सेंटर आणि कायदा व सुव्यस्था, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे यांच्याकडे निवडणूक खर्च, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे कायदा व सुव्यवस्था, मनपाचे उपायुक्त डी. पी. कुलकर्णी यांच्याकडे निवडणूक निरीक्षक, एमआयडीसीचे सोहम वायाळ यांच्याकडे मतपत्रिका व डमी मतपत्रिका, जिल्हा नियंत्रण अधिकारी ए. एस. थोरात यांच्याकडे संगणक, कम्युनिकेशन प्लॅन, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांच्याकडे स्वीप कार्यक्रम आणि तहसीलदार प्रवीण मेंगशेट्टी यांच्याकडे मतदारांसाठी हेल्पलाईन आणि तक्रार निवारण कक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. या सर्व कक्ष प्रमुखांना त्यांना लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.