माधुर्य गाण्यातील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या 30 वर्षांपासून पार्श्वगायन करणाऱ्या गायिका माधुरी करमरकर ‘स्वरमाधुरी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रथमच सोलो गायकीद्वारे रसिकांच्या भेटीला येत आहेत.

कलेचं श्रेय गुरूंना…

कलेचं क्षेत्र म्हणजे अनियमित वेळा आणि नोकरीच्या वेळा या ठरलेल्या असतात. दोन्ही क्षेत्रांतल्या लोकांनी बरीच वर्षे सांभाळून घेतलं. त्यामुळे ही कला जोपासू शकले. खळेकाका, देवकाका, पंडित हृदयनाथ मंगेशकर, प्रभाकर पंडित यांचं मार्गदर्शन लाभलं. संगीतकार अशोक पत्की यांच्याबरोबर 18 वर्षे काम केलं. क्लासिकल गुरू पंडित मनोहर चिमोटे आणि पंडित शंकर अभ्यंकर यांनी खूप आपुलकीने शिकवलं. पंडित अभ्यंकर यांनी माझ्याकडून परीक्षेची तयारी करून घेतली. अभ्यासक्रमातील रागांच्या बंदिशी शिकवल्या. त्यांच्या शिकवण्याचा मला आजही उपयोग होतो. ते मला सांगायचे,‘‘करत रहा!’’ त्यांच्या असे म्हणण्याचा अर्थ मला आज उमगतो आहे. कारण संगीत हा कधीही न संपणारा महासागर आहे, किती कराल तेवढं कमी आहे, अशा आठवणी सांगताना त्या रमतात.

नाटय़पदं, भावगीतं, सुगम संगीत तसेच श्रीधर फडके, श्रीनिवास खळे, यशवंत देव, लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माणिक वर्मा अशा दिग्गज गायकांनी गायलेल्या अजरामर गाण्यांचा आनंद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. गायिका माधुरी करमरकर प्रथमच आपल्या सोलो गायकीच्या माध्यमातून हा एक आगळावेगळा कार्यक्रम सादर करत आहेत. सोहम प्रतिष्ठानतर्फे या अनोख्या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाविषयी गायिका माधुरी करमरकर सांगतात, गेल्या काही वर्षांपासून मी पार्श्वगायिका म्हणून गातेय. अशावेळी दोन पुरुष आणि दोन स्त्री गायिका अशा सेटअपमध्ये मी असंख्य कार्यक्रम केले, मात्र ‘स्वरमाधुरी’ या बॅनरखाली मी गायलेली जुनी गाणी, काही अल्बममधली तर काही नवी गाणी सादर करणार आहे. या कार्यक्रमाचं वैशिष्टय़ असं की, फक्त ठरावीक डय़ुएट गाण्यांसाठी सहगायक जय आजगावकर यांची साथ लाभली आहे. जुनी गाणी गात राहणं, त्याबरोबरच नवी गाणी… शिवाय भावगीत, लावणी, सुगम संगीत अशी गाण्यांची विविधता रसिकांपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

एवढी वर्षे त्या प्रेक्षकांसमोर गाणी सादर करत आहेत. याकरिता मूळ गाणं सतत ऐकत राहणं ही त्यांची सवय त्या आजही जोपासतात. तेव्हा अशा प्रत्येक वेळी नव्या गोष्टी लक्षात येतात. एखाद्या विशिष्ट रागावर आधारित असलेलं गाणं आपल्या पद्धतीने गायलं तरीही मूळ गाणं ऐकताना नव्या गोष्टी लक्षात येतात. श्रीनिवास खळे, यशवंत देव यांचं खूप सहाय्य गाणं शिकताना मिळालं. बडय़ा संगीतकारांकडून मार्गदर्शन मिळणं याचा एक वेगळा फायदा असतो. कारण त्यांनी ती गाणी याआधी दैवी आवाजाकडून गाऊन घेतलेली असतात. त्यामुळेच त्यांना ती गाणी आमच्यासारख्या गायकांना शिकवावीशी वाटतात. कारण त्यातलं वेगळेपण आम्हाला सांगायचं असतं. त्यामुळे शिकवलेल्या वेगळ्या गोष्टी मी कार्यक्रमादरम्यान अमलात आणून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते असा अनुभव दिग्गज गायकांच्या गाण्याविषयी सांगताना त्या गहिवरतात.

पूर्वी ठरावीक गायक ठरावीक गाणंच गायचे, पण आता शास्त्रीय संगीतापासून वेगवेगळ्या जॉनरची गाणी गायकांना गावी लागतात. तशा गाण्यांचा रियाज करणं आता आवश्यक झालंय. याकरिता लावणी, भावगीत, लावणी, पाश्चात्त्य गाणी, नाटय़गीतं, अभंग अशी गाणी त्यांनी स्वतः बसवली. हळूहळू मराठीबरोबर हिंदीही गाणी त्या गाऊ लागल्या. याव्यतिरिक्त बंजारा, छत्तीसगढी, संस्कृत गाणीही त्यांनी गायली आहेत. त्यामुळे संगीत हा एक न संपणारा प्रवास आहे असे माधुरी करमरकर यांना वाटते.

नव्या गायकांविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, माझे समकालीन गायक आणि माझ्यापेक्षा लहान गायकही तांत्रिकदृष्टय़ा खूप हुशार आहेत. त्यांची मेहनत करण्याची तयारी आहे. ते सादरीकरणावर मेहनत घेतात. रियाज केला पाहिजे ही जाणीव त्यांना आहे, पण गायकाच्या बाबतीत आवाज सांभाळणं हा फार महत्त्वाचा भाग आहे. शिवाय फक्त कार्यक्रमासाठी गाण्याची तयारी करण्यापेक्षा रियाजाकडे लक्ष असणं महत्त्वाचं आहे. याकरिता कार्यक्रमांची संख्या मर्यादित ठेवणं त्याचा समतोल राखणंही कलाकारासाठी महत्त्वाचं असतं.