
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई शहर स्वच्छ ठेवण्यासाठी हजारो सफाई कामगार दिवसरात्र मेहनत करतात. त्यांच्या मदतीला आता आधुनिक पद्धतीच्या भूमिगत कचरापेटय़ा आल्या आहेत. या आगळय़ावेगळय़ा कचरापेटय़ांमुळे मुंबईच्या स्वच्छतेत नक्कीच भर पडेल असा विश्वास शिवसेना नेते-युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच ओसांडून वाहणाऱया कचरापेटय़ांचे चित्रही दिसणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई महापालिकेने नेताजी सुभाषचंद्र मार्गावर गिरगाव चौपाटी येथे बसवलेल्या भूमिगत कचरापेटय़ांचे लोकार्पण आज शिवसेना नेते- युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. मुंबईत दररोज आठ-दहा हजार मेट्रिक टन कचरा गोळा होतो. अनेक ठिकाणी कचरापेटय़ा उघडय़ावर असल्याने तेथे टाकलेला कचरा आजूबाजूला पडून अस्वच्छता वाढते. मात्र या भूमिगत कचरापेटय़ांमुळे कचरा बंदिस्त राहणार असल्याने परिसर निश्चितच स्वच्छ राहील, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच कचरापेटय़ाही स्वच्छ राहणार असल्याने कचरा टाकणाऱयांनही चांगली सवय लागेल असे ते म्हणाले. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, शिवसेना उपनेत्या मीना कांबळी, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, आरोग्य समिती अध्यक्ष डॉ. अर्चना भालेराव, नगरसेविका अरुंधती दुधवडकर, नगरसेवक अतुल शहा, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, उपायुक्त विश्वास शंकरवार आदी उपस्थित होते.
अशी आहे भूमिगत कचरापेटी
तीन मीटर लांब आणि दोन मीटर रुंद जागेत जमिनीत खड्डा काढून आतमध्ये ओल्या आणि सुक्या कचऱयासाठी दोन पेटय़ा बसवल्या आहेत. त्यामध्ये ओला आणि सुका कचरा टाकण्याची व्यवस्था आहे. तसेच वरून बंद असलेल्या या पेटय़ा भरल्यानंतर सहजपणे हायड्रालिक जॅकच्या मदतीने पेटय़ा अलगदपणे उचलून गाडीमध्ये कचरा टाकण्याची व्यवस्था आहे. गिरगाव चौपाटीबरेबरच चितागेट कुलाबा येथेही एक भूमिगत कचरापेटी बसवली असून लवकरच नेपियन सी हाऊस नेपियन सी रोड येथेही बसवली जाणार आहे.
हेरिटेज असलेल्या केनेडी सिफेस लॅम्पची केली पाहणी
गिरगाव चौपाटी येथे 19 व्या शतकाच्या सुरुवातीला उभारलेल्या केनेडी सिफेस लॅम्पला हेरिटेज दर्जा आहे. या हेरिटेज वास्तूची आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. तसेच त्याच्या दुरुस्तीच्या सूचना पालिका अधिकाऱयांना दिल्या.
सफाई कामगारांचा सन्मान
मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कामगार ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगत काम करतात. त्याची दखल घेत आदित्य ठाकरे यांनी लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सफाई कामगारांना पुढे बोलावून घेत त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
























































