चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न फसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। जालना

एसटी बसला जबरदस्तीने थांबवून एसटीतील विद्यार्थिंनीला काही तरुणांनी बळजबरीने उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र बसच्या चालक आणि वाहक यांच्या प्रसंगावधानामुळे युवकांचा प्रयत्न फसला. या प्रकरणी वाहकाच्या तक्रारीवरुन घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकारामुळे पालकांत घबराट उडली आहे.

एसटी महामंडळाच्या वतीने खास विद्यार्थी आणि विद्यार्थिंनीसाठी मानव विकासच्या बसेस चालविण्यात येतात. काल 11 फेब्रुवारी रोजी (एमएच-06 एस- 8705) ही बस अंबडहून विद्यार्थ्यांना घेऊन कुंभारपिपंळगावकडे जात असतांना या बसचा 3 युवकांनी पाठलाग केला. बोधलापुरी येथे दुपारी 2.40 वाजता बस येताच त्या युवकांनी बसला ओव्हर टेक करत बस समोर मोटार सायकल आडवी लावली. त्यानंतर आतील एका विद्यार्थिनीला खाली उतरवा, असे सांगितले.

मात्र वाहक श्रीपाद वाघ्रुळकर व चालक भगवान आव्हाड यांनी प्रसंगावधान राखत याला विरोध केला. तेंव्हा चालक भगवान आव्हाड यांना युवकांनी शिवीगाळ केली. या प्रकारामुळे पालकांत खळबळ उडाली असून बसचेचालक भगवान आव्हाड यांनी घनसावंगी पोलीस ठाण्यात तीन युवकांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत.