
सामना प्रतिनिधी, पुणे
सुमारे दोन वर्षांपूर्वी गुन्हे शाखेने एका सराईत गुन्हेगाराला पकडून त्याने त्याच्या राणी नावाच्या मैत्रिणीचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह जाळून टाकल्याचा गुन्हा उघडकीस आणल्याचा मोठा गाजावाजा केला होता. मात्र, सराईत गुन्हेगार हुक्या याच्याविरोधात पुरावाच न सापडल्याने त्याला गुन्ह्यातून वगळण्याची नामुष्की आली आणि जिचा खून केला ती राणीही जिवंत आहे. त्यामुळे नेमका खून कोणाचा झाला आणि कोणी केला? हा प्रश्न निरुत्तरित असताना गुन्हे शाखेची बोगसगिरी उघडकीस आली आहे.
कोंढव्यातील स्काय पार्क सोसायटीजवळील मोकळ्या जागेत 4 मार्च 2017 रोजी एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. त्याचा तपास केल्यानंतर पाच महिन्यांनी हा गुन्हा उघडकीस आला. त्यामध्ये राणी (पूर्ण नाव, पत्ता नाही) हिचा खून करून पेट्रोल टाकून तिला अर्धवट जाळून टाकल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट दोनने हृषिकेश ऊर्फ हुक्या श्रीकांत याला 16 ऑगस्ट 2017ला अटक केली होती, तर त्याचा साथीदार विकास ऊर्फ विकी जढार याला नाशिक कारागृहातून ताब्यात घेतले. हा गुन्हा उघडकीस आणल्यानंतर याची माहिती देण्यासाठी गुन्हे शाखेने पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये हुक्या, विकी, राणी आणि आणखी एकजण स्काय पार्क सोसायटीच्या जवळील मोकळ्या मैदानात दारू पित बसले होते. राणी ही या तिघांची मैत्रीण होती. त्यावेळी विकीने राणीला ‘तू माझ्या बायकोसोबत फिरत जाऊ नकोस,’ असे बजावले होते.
त्यावेळी तिने ‘तुझी बायको काय लहान आहे काय’ असे उलट उत्तर दिल्याने विकीने कोयत्याने वार केले. दुसऱ्याने दगड डोक्यात घातला, तर हुक्याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकले, अशी ‘स्क्रिप्ट’ सांगण्यात आली होती. हे आरोपी कोंढवा पोलिसांनी हस्तांतरित केल्यानंतर त्यांनी पुढील तपास केला. त्यात हुक्या आणि त्याचा मित्र जठार या दोघांच्या विरोधात कोणताही पुरावा सापडला नाही, तर खून झालेली महिला राणी आहे, असे सांगितले जात होते, ती ही जिवंत निघाली असून, तिचा जबाब घेण्यात आला. त्यामुळे हुक्याला सीआरपीसी 169नुसार प्रस्ताव पाठवून या गुन्ह्यातून वगळण्यात आले.
मुळातच गुन्हे शाखेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी केवळ चमकोगिरी करण्याच्या नावाखाली खून झालेल्या महिलेची ओळख पटण्यापूर्वीच चुकीच्या आधारे ज्याचा या गुन्ह्याचा दूरदूरपर्यंत संबंध नाही, अशांना यामध्ये गोवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेला खुनाचा 61/2017 या क्रमांकाचा गुन्हा अद्यापही उघडकीस आलेला नाही. दरम्यान, अशाच प्रकारे पौड पोलीस ठाण्यातील एकाचा खून केल्याचा दावा यावेळी युनिट दोनने केला होता, त्याचे काय झाले, हे अद्यापि स्पष्ट झालेले नाही.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे म्हणाले, या गुन्ह्याची माहिती घेऊन पुढील तपास केला जाईल.
गुन्ह्याच्या तपासाबाबत सर्वचजण अंधारात
ऑगस्ट 2017 मध्ये गुन्हे शाखेने गुन्हा उघडकीस आणला, त्यावेळचे युनिट दोनचे वरिष्ठ निरीक्षक, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त, पोलीस उपायुक्त यांची आता बदली झाली आहे. जे अधिकारी सध्या आहेत, त्यांना खून आणि त्याच्यातील बोगसगिरीबद्दल काहीच माहिती नाही. कोंढवा पोलीस ठाणे आणि परिमंडळातील अधिकारीही नवीन असल्याने त्यांनाही या गुन्ह्याची माहिती नाही. त्यामुळे पुण्यात 74 खुनाचे गुन्हे अनडिटेक्टेड असताना आता त्यात आणखी एकाची भर पडून ती 75 वर गेली आहे.
नऊ महिन्यांत 38 जबरी चोऱ्या
ह खुनाच्या गुन्ह्यात हुक्याचा सहभाग स्पष्टच होऊ शकला नसल्याने तो यातून एकप्रकारे निर्दोषच सुटला. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने जून 2018 पासून आत्तापर्यंत 38 जबरी चोऱ्या केल्या आहेत. त्याला नुकतेच गुन्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केली आहे.






























































