टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात टीसीचा लोकलखाली पडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कल्याण

मध्य रेल्वेवर एका टीसीचा विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला पकडताना लोकलखाली पडून मृत्यू झाला आहे. अरुण गायकवाड (50) असे मृत्यू झालेल्या टीसीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी मध्य रेल्वेच्या कल्याण – कसारा मार्गावरील उंबरमाळी स्थानकात हा अपघात झाला. रेल्वेकडून दिले गेलेले दंड वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात गायकवाड यांना जीव गमवावा लागल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

गायकवाड हे कसाऱ्याहून टिटवाळ्याला जाणाऱ्या लोकलमध्ये तिकीट तपासणी करत होते. उंबरमाळी स्थानकात गाडी येताच त्यांचे लक्ष एका विनातिकीट प्रवास करण्याऱ्या प्रवाशाकडे गेले. ते त्या प्रवाशाला पकडण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याने फलाटावर उतरून दुसऱ्या डब्यात प्रवेश केला. गायकवाड देखील त्या प्रवाशाच्या मागे धावले, मात्र ते गाडीत चढणार इतक्यात गाडी सुरू झाली. त्यावेळी गायकवाड यांचा तोल गेल्याने ते खाली पडले आणि लोकलखाली येऊन गंभीर जखमी झाले. घटनास्थळी असलेल्या प्रवाशांनी याबाबतची महिती रेल्वे पोलिसांना दिल्यावर गायकवाड यांना तत्काळ शहापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, रेल्वे प्रशासन टीसींना प्रवाशांकडून दंड वसूल करण्याचे जे टार्गेट देत असते, त्यामुळेच अपघात धाल्याचा आरेप करत असा प्रकारचे दंडवसुलीचे टार्गेट देणे बंद करण्यात यावं अशी मागणी गायकवाड यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवाराने केली आहे. अरुण गायकवाड हे विक्रोळीचे रहिवासी असून यांच्या मागे पत्नी आणि तीन मुलं असा परिवार आहे.