
सामना प्रतिनिधी, रेनापुर
मौजे गरसुळीत येथे 16 फेब्रुवारी रोजी भरदिवसा घरफोडी घडली असून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास झाले आहेत. शनिवारी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास ही घटना घडली.
शिवराम मुकुंदा नरवटे हे गरसुळी येथील रहिवासी असून त्यांनी त्यांच्या खासगी कामासाठी त्याच्याकडे असलेले सोयाबीन विकून व ऊसाचे बील व इतर सर्व मिळून अंदाजे तीन लाख वीस हजार रुपये रोख आणि पाच ते सहा तोळे सोन्याचे दागिने असा ऐवज घरच्या कपाटात ठेवलेला होता. शिवराम हे रोजच्या प्रमाणे शेतात कामासाठी गेले होते. त्यांच्या पत्नी जनाबाई या देखील शेतात घराला कुलूप लावून गेल्या होत्या. चोरटय़ांनी ह्या गोष्टीचा फायदा घेऊन दुपारी दोन ते तीनच्या सुमारास निर्मनुष्य परिसराचा अंदाज घेऊन घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व कपाटात ठेवलेले रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास करून पोबारा केला. या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


























































