मराठमोळ्या खेळाची जगाला भुरळ, पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेचे जेतेपद हिंदुस्थानच्या खिशात 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी ।  मुंबई 

जागतिक  मल्लखांब महासंघाच्या  विद्यमाने आणि हिंदुस्थानी मल्लखांब महासंघ तसेच महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना यांच्या वतीने पार पडलेल्या मुंबई मधील श्री. समर्थ व्यायाम मंदिर आयोजित जागतिक मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धेत संपूर्ण विश्वात मल्लखांबाचा प्रसार करणाऱ्या हिंदुस्थानच्या महिला संघाने सांघिक विजेतेपद पटकावले. यजमान हिंदुस्थानने विजेतेपदावर  244.73 गुण मिळवून आपले नाव कोरले. तर 44.45 गुण मिळवून सिंगापूरने आणि 30.22 गुण मिळवून मलेशियाने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.

या स्पर्धेमध्ये 15 देशांच्या  जवळपास 150 हुन अधिक मल्लखांबपटूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धा बघण्यासाठी  देशभरातील  विविध राज्यांमधून  हजारो आजी-माजी मल्लखांबपटूंनी हजेरी लावली होती.

दोन दिवस चाललेल्या पहिल्या जागतिक मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धेची सांगता आणि पारितोषिक वितरण रविवारी शिवाजी पार्कच्या प्रांगणात मोठ्या दिमाखात पार पडले. हिंदुस्थानात आयोजित या पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेमध्ये यजमान हिंदुस्थानसह जगभरातील  इराण, मलेशिया, सिंगापूर, व्हिऐतनाम, जपान, इंग्लंड,  नॉर्वे, बहारीन, फ्रान्स, इटली, स्पेन, झेक रिपब्लिक, अमेरिका, जर्मनी अशा 15 देशांनी सहभाग घेतला होता.

विविध देशातून आलेल्या स्पर्धकांचे दोरी आणि पुरलेल्या मल्लखांबावरचे सादरीकरण बघण्यासाठी साधारण तीन-चार हजार प्रेक्षक उपस्थित होते. सांघिक विजेतेपदाच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक संघामध्ये सहा खेळाडू असणे आवश्यक होते. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी प्रत्येक खेळाडूला दोरी आणि पुरलेला मल्लखांब अशा दोन साधनांवर दोन लहान आणि दोन मोठे असे चार संच करणे अनिवार्य होते.  महिला आणि पुरुष वयोगटातून निवडल्या गेलेल्या सर्वोत्तम सर्वोत्तम दहा खेळाडूंमध्ये वैयक्तिक अजिंक्यपदासाठी स्पर्धा क्रमांक दोनमध्ये सुरस रंगली. तर स्पर्धा क्रमांक तीनचे विजेतेपद साधनांवर केल्या जाणाऱ्या लहान आणि मोठ्या संचांमधील सर्वोत्तम कामगिरी साठी देण्यात आले.

मराठमोळ्या मल्लखांबपटूंनी जिंकली उपस्थितांची मने 

महाराष्ट्राची संस्कृती जपणारा मल्लखांब महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या कुशलतेने खेळला जातो. या स्पर्धेच्या निमित्ताने साताऱ्यामधील कारी मल्लखांब संघ, विले-पार्ले मधील पार्लेश्वर व्यायामशाळा यांनी मल्लखांबाचे सादरीकरण केले. ओरिसा मधून आलेल्या श्रीलताने केलेल्या पुरलेल्या मल्लखांबावरच्या सादरीकरणाने  हिंदुस्थानात  मल्लखांबाचा  प्रसार झाल्याचे दिसून आले.

बारा वर्षाहून अधिक काळ मल्लखांबाचे प्रशिक्षण घेणाऱ्या जर्मनी देशाने पुरलेल्या मल्लखांबावर मनोरे करून आपले सांघिक कसब सिद्ध केले. मराठमोळ्या मल्लखांबपटूंनी अफलातून कसरतीचे प्रदर्शन करीत उपस्थित हजारो क्रीडा शौकिनांची मने जिंकली.

स्पर्धेच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने महिला विभागात द्वितीय आलेल्या इटलीच्या डेलिया सेरुटीने दोरी मल्लखांबावर तर जपानच्या कोइको टाकेमोटोने पुरलेल्या मल्लखांबावर आपले संच सादर केले. पुरुष विभागातून दीपक शिंदे आणि सागर ओहळकर यांनी दोरी आणि पुरलेल्या मल्लखांबावर आपले कौशल्य सादर केले. ‘मल्लखांब महागुरू’ उदय  देशपांडे यांच्या जर्मनी मधील मल्लखांब शिष्यांनी संगीताच्या चालीवर आपले मनोरे सादर केले. श्री समर्थ व्यायाम मंदिरात प्रशिक्षण घेणाऱ्या दोन योगासनपटूंनी योगासनाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक केले.

पहिल्या जागतिक अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेच्या सांगता सोहळ्यास  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मल्लखांबामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कर मिळवलेल्या आदित्य अहिरे ( सातारा), यशवंत साटम (मुंबई उपनगर), राजेश राव (मुंबई उपनगर), रवींद्र पेठे (पुणे), महेंद्र चेंबूरकर (मुंबई उपनगर), शांताराम जोशी (रत्नागिरी), नंदा शिंदे (मुंबई शहर), चित्रा खवळे (मुंबई शहर), पंकज शिंदे (पुणे), सत्यजित शिंदे (पुणे), विक्रांत दाभाडे (सातारा), कल्पेश जाधव (मुंबई उपनगर), प्रदीप चेंबूरकर (मुंबई उपनगर) या तेरा खेळाडूंकडून स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. या संपुर्ण स्पर्धेचे यशस्वी आयोजन  शिवछत्रपती, दादोजी कोंडदेव आणि जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ‘मल्लखांब महागुरू’ उदय देशपांडे आणि त्यांच्या टिमने केले होते.