
सामना प्रतिनिधी, मोखाडा
एकीकडे मोखाडा तालुक्यात भीषण पाणीटंचाई सुरू असतानाच केंद्र सरकारचा नदीजोड प्रकल्प वादाच्या भोवऱयात सापडला आहे. या प्रकल्पांतर्गत मोखाड्यात पाच धरणे बांधणार असून त्याचे पाणी मात्र गुजरातला पळविले जाणार आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी उद्या सोमवारी पाणीहक्क परिषद आयोजित करण्यात आली असून त्यात ग्रामस्थांच्या संतापाचा भडका उडणार आहे. या प्रकल्पाचे पाणी आधीच सधन असलेल्या सिन्नर एमआयडीसीलादेखील देण्यात येणार असल्याने त्यास मोखाडावासियांनी विरोध केला आहे.
20 गावांना 7 टँकरने पाणीपुरवठा
मोखाडा तालुक्यातील 20 गावांमध्ये सध्या मोठय़ा प्रमाणावर टंचाई जाणवत असून 7 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. फेब्रुवारी महिना अर्धा संपतानाच ही स्थिती असून मे महिन्यापर्यंत संपूर्ण मोखाडा तालुका टंचाईने ग्रासून जाणार आहे.
प्रमुख मागण्या
प्रस्तावित दमण गंगा वैतरणा प्रकल्प रद्द करा.
केंद्र सरकारने विकास आराखडा बदलून मोखाडय़ासाठी पाणी राखून ठेवले पाहिजे.
संपूर्ण मोखाडा तालुक्याला पाणीपुरवणारी 37 कोटींची योजना मंजूर करा.
सध्याच्या वाघ, खोच, सायदे व तुळ्याचा पाडा या धरणाच्या पाण्याचा फक्त सिंचनासाठी वापर होईल यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे.
केंद्र सरकारच्या जलसंसाधन मंत्रालयांतर्गत दमण गंगा, वैतरणा व गोदावरी या तीन नद्या एकमेकांना जोडल्या जाणार आहेत. त्यासाठी मोखाडा तालुक्यातील चिंचुतारा, भेंडीपाडा, वडाचापाडा, बेडूकपाडा, उधळे या गावांमध्ये पाच धरणे बांधली जाणार असून या संपूर्ण प्रकल्पासाठी 2 हजार 700 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्याकरिता मोखाडय़ातील 3 हजार 289 एकर जमीन संपादित होणार असून 3 हजार 82 एकर क्षेत्र बुडिताखाली येईल.
ही पाचही धरणे मोखाडा तालुक्यात होणार असली तरी त्यातील एक थेंबही पाणी येथील ग्रामस्थांना मिळणार नाही. सर्व पाणी सिन्नर एमआयडीसीला पुरवले जाणार असून शेजारच्या गुजरातलाही काही पाणी दिले जाणार आहे. हे पाणी पोहोचवण्याकरिता 300 कोटी रुपये खर्च होतील.
या प्रकल्पाविरोधात मोखाडय़ातील विठ्ठलदादा सभागृहात पाणी परिषद होणार असून शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. बेरोजगारी, अठराविश्व दारिद्रय़ आणि भीषण पाणीटंचाई यातून येथील आदिवासी बाहेर पडलेला नाही. अशा परिस्थितीत मोखाडय़ात पाच धरणे बांधून त्याचे पाणी गुजरात व सिन्नरला देण्यास ग्रामस्थांनी ठाम विरोध केला आहे.

























































