
सामना प्रतिनिधी । नगर
शिर्डी येथून पोहेगांवला येत असताना चांदेकसारे परिसरात साई मुकुंद हॉटेल नजीक अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने या अपघातात एका मोटरसायकलस्वार व्यक्तीचा मृत्यू झाला. संजय सुधाकर औताडे (45) राहणार पोहेगाव, तालुका कोपरगाव. असे मृताचे नाव आहे.
शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता शिर्डी वरुन आपले काम आटपून संजय औताडे हे दुचाकीवरून पोहेगाव येथे आपल्या घरी येत असताना शिर्डी – नाशिक रोडवरील चांदेकसारे शिवारात हॉटेल साई मुकुंदा जवळ समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोरात धडक दिली. त्यात संजय औताडे हे जबर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शिर्डी येथे सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रात्री उशिरा त्यांच्या निधनाची बातमी पोहेगावात समजली, असता त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत होती.
रविवारी सुट्टी असल्याने त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन राहाता ग्रामीण रुग्णालयात सोमवारी करण्यात आले, त्यानंतर त्यांचे पार्थिव कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. सोमवारी सकाळी पोहेगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, आई ,वडील असा परिवार आहे.




























































