जनावरांच्या छावण्या सुरू करण्यासाठी करंजीत दोन तास आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

जनावरांच्या छावण्या सुरू करण्यासाठी करंजी मंडळातून ८९ प्रस्ताव दाखल झाले असतांना प्रशासनाने केवळ एका छावणीला मंजूरी दिली असून इतर छावण्यांनाही तात्काळ मंजुरी द्यावी, या मागणीसाठी आज तालुक्यातील करंजी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे नगर दक्षिणचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे यांनी केले. शासनाने एका मंडळात केवळ एकाच छावणीला परवानगी दिली असून करंजी मंडळातून छावणी चालवण्यासाठी तालुक्यातून सर्वाधिक ८९ प्रस्ताव आले होते. महसूल प्रशासनाने या पैकी एका प्रस्तावाला मान्यता दिली मात्र त्यामुळे मोठी नाराजी निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर आज सकाळी रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात गाडे व तनपुरे यांच्यासह जिल्हा परीषद सदस्य अनिल कराळे, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख रफिक शेख, माजी सभापती संभाजी पालवे, गोविंद मोकाटे, अमोल वाघ, राजेंद्र पाठक, अशोक अकोलकर, शरद मरकड, अॅड सुनिल राजळे, जालींदर वामन यांच्यासह शेतकरी बैलजोड्यासह सहभागी झाले होते.

या वेळी बोलताना प्रा. शशिकांत गाडे यांनी भाजपवर टिका करत चारा छावण्याच्या प्रस्ताव मंजुरीसाठी पालकमंत्री, आमदाराच्या शिफारशीची गरज काय असे म्हणत लहान जनावरासाठी पन्नास तर मोठ्या जनारांसाठी शंभर रूपये अनुदान देण्याची मागणी करत राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व प्रस्तावांना तात्काळ मंजूरी द्या अन्यथा तालुक्याच्या प्रत्येक तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा दिला. तर या वेळी बोलताना प्राजक्त तनपुरे म्हणाले की, कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळामध्ये मागेल त्याला चारा छावणी मिळत होती . शेतकऱ्यांना खरीप, रब्बीसह फळबागांसाठी अनुदान दिले जात होते मात्र या सरकारला दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य नसून छावण्याबाबतही राजकारण केले जात असल्याचा आरोप प्राजक्त तनपुरे यांनी केला. या आंदोलनाची दखल तहसीलदार नामदेव पाटील यांनी घेत ते आंदोलस्थळी आले व त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून इतर छावण्यांना तात्काळ मंजुरी देवू , असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.