शहापूर कंदी प्रकल्प आणि पाकिस्तान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सनतकुमार कोल्हटकर, [email protected]

दिवाळखोरीचे मोठे संकट पाकिस्तानवर घोंघावत आहे. यापूर्वीच्या काळात तो देश रावी नदीवर ती पाकिस्तानच्या ज्या भागातून वाहत जाते तिथे कोणतेही धरण बांधू शकला नाही. आताच्या अर्थसंकटात तर त्याला हे शक्यही नाही. आता हिंदुस्थानने त्याच्या स्वतःच्या वाटय़ाचे पाणी वापरायचे ठरविल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा उठला आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ातच केंद्र सरकारच्या कॅबिनेटने ‘शहापूर कंदी धरण’ रावी नदीवर बांधायला मंजुरी दिली. हे धरण पंजाबमधील पठाणकोट जिह्यामध्ये रावी नदीवर बांधले जाणार असून त्यामुळे जवळ जवळ 12000 क्युसेक्स पाणी वापरायला मिळेल. या पाण्याचा फायदा पंजाब आणि जम्मू-कश्मीरमधील ‘रावी’ नदी परिसरातील जमीन ओलिताखाली आणण्यास होईल. रावी नदीचा उगम हिमाचल प्रदेश या राज्यातील कांग्रा जिह्यातून होतो. रावी नदी जम्मू-कश्मीरनंतर पुढे पाकिस्तानमध्ये प्रवेश करून लाहोरपर्यंत व त्याच्याही पुढे वाहत जाते, परंतु अजून एका धरणाची आता हिंदुस्थानला गरज आहे. सतलज आणि बियास या दोन्ही नद्याही तेवढय़ाच महत्त्वाच्या आहेत. हिंदुस्थानातून एकूण सतलज, बियास, रवी, झेलम, झेनब आणि इंडस या नद्या पुढे पाकिस्तानमध्ये वाहत जातात.

‘शहापूर कंदी’ हे धरण बांधण्यासाठी लागणारा 485.38 कोटी रुपयांचा खर्च केंद्र सरकार करणार आहे. पुढील पाच वर्षांत म्हणजे 2023 शाळांपर्यंत हे धरण पूर्णपणे बांधून कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.

या धरणामुळे वीजनिर्मितीही अपेक्षित असून ती साधारण 200 मेगावॅटपर्यंत होणे अपेक्षित आहे. धरण बांधण्याचा खर्च नाबार्डमार्फत केला जाईल असे दिसते आहे. या धरण प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय पाणी लवादाच्या बरोबरच जम्मू कश्मीर आणि पंजाब या दोन्ही राज्यांचे ‘चीफ इंजिनीअर्स’ही असतील. जम्मू-कश्मीरला येथून तयार होणाऱया विजेतील 20 टक्के वीज मिळू शकेल.

या धरणावर होणाऱया वीजनिर्मितीसाठी होणारा खर्च साधारण 1408 कोटीपर्यंत असेल असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. हे धरण बांधण्याची घोषणा झाल्यापासून पाकिस्तानने आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. आताच पाकिस्तानमध्ये पाणीटंचाईचे संकट गहिरे झालेले आहे. पुढील पाच वर्षांत पाकिस्तानला दुष्काळाचा मोठा सामना करावा लागणार आहे. पाकिस्तान सध्या प्रचंड अशा आर्थिक संकटामधून जात असून पाकिस्तानमधील नद्यांमधून समुद्रात वाया जाणारे पाणी अडविण्यासाठी त्याला त्यांच्या भूभागात धरणे बांधायची गरज आहे, पण भिकेच्या मार्गावर असलेल्या पाकिस्तानला येणाऱया काळात धरणे बांधणे शक्य होईल असे वाटत नाही. बेशिस्त आणि अनियंत्रित पाणी वापरामुळे पाकिस्तानवर ही परिस्थिती ओढवणार आहे असे तेथील जाणकारांचे म्हणणे आहे.

पाकिस्तान म्हटले की, डोळ्यांसमोर येतो तो दहशतवाद आणि दहशतवादी संघटना, तेथील उच्चपदस्थ राजकारणी, लष्करी अधिकारी आणि क्रिकेट संलग्न घडामोडी. संयुक्त राष्ट्रांच्या अभ्यास अहवालानुसार पाकिस्तानमध्ये साल 2025 पर्यंत पाण्याची प्रचंड कमतरता निर्माण होणार असून दुष्काळाची व्याप्ती मोठी असेल. पाण्याच्या संकटाने पाकिस्तान पुरेपूर जेरीस येणार हे स्पष्ट आहे.

दिवाळखोरीचे मोठे संकट पाकिस्तानवर घोंघावत आहे. यापूर्वीच्या काळात तो देश रावी नदीवर ती पाकिस्तानच्या ज्या भागातून वाहत जाते तिथे कोणतेही धरण बांधू शकला नाही. आताच्या अर्थसंकटात तर त्याला हे शक्यही नाही. आता हिंदुस्थानने त्याच्या स्वतःच्या वाटय़ाचे पाणी वापरायचे ठरविल्याने पाकिस्तान सरकारच्या पोटात गोळा उठला आहे. शहापूर कंदी धरणाच्या बांधकामामुळे आणि ते बांधून झाल्यावरही हिंदुस्थानात कुशल व अकुशल लोकांसाठी मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे.

पाण्याची उपलब्धता हीच येणाऱया काळात प्रत्येक देशाची घालमेल वाढवणार हे निश्चित. पाकिस्तानमधील सिंध आणि बलुचिस्तान या दोन्ही भागांमध्ये प्रचंड असंतोष आहे. तेथील जनता पाकिस्तानी लष्कराच्या व आयएसआयच्या अत्याचाराने होरपळून निघत असल्याचे सांगण्यात येते. पाणीटंचाईने हैराण झाले असतानाच तेथील जनता या अत्याचाराने त्रस्त आहे. त्यामुळे येणाऱया काळात पाकिस्तान या सर्वांना कसे तोंड देतो ते पाहावे लागेल.