
सामना प्रतिनिधी, अलिबाग
अवेळी पडणारा पाऊस, वाढलेली थंडी, वाऱ्याची बदलणारी दिशा आणि भागांची भरती या वातावरणातील बदलांचा मासेमारीला जोरदार फटका बसला आहे. समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना मैलोन्मैल भटकंती केल्यानंतरही मासे सापडत नाहीत. त्यांची जाळी रिकामीच राहात आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात यंदा मच्छीचा दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी कोळी समाजाकडून होत आहे.
रायगड जिल्ह्याला 240 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह हा मासेमारीवर चालतो. मात्र यंदा वातावरणात अचानक बदल झाल्याने त्याचा जोरदार परिणाम मासेमारीवर झाला आहे. माशांचे प्रमाण कमी झाल्यामुळे मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटी रिकाम्या परत येत आहेत. जे मासे जाळ्यात अडकतात त्यांचे प्रमाण फार कमी आहे. त्यामधून बोटींच्या डिझेलचा खर्चही भागत नाही. मासेमारीसाठी फक्त आता तीनच महिने उरलेले असताना ही परिस्थिती ओढावल्यामुळे कोळी समाज आर्थिक अडचणीत आला आहे. या आणीबाणीच्या प्रसंगात मच्छीमारांना तारण्यासाठी सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱयांच्या धर्तीवर आम्हाला आर्थिक सहकार्य करावे, अशी प्रतिक्रिया मच्छीमार नेते मनोहर बैले यांनी व्यक्त केली आहे.
समुद्रात मासे मिळत नसल्यामुळे अनेक बोटी किनाऱयावर उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे बोटींवर काम करणाऱया हजारो कामगांराचा रोजगार बुडाला आहे. पापलेट, सुरमई, राकस ही सर्वाधिक मागणी असलेली मच्छी या हंगामात मुबलक प्रमाणात मिळायची. मात्र यंदा तिचे प्रमाण कमी झाल्याने ग्राहकांची निराशा झाली आहे.
मासे गेले खोल समुद्रात
वातावरणात झालेल्या बदलामुळे तसेच थंडी, वारा यामुळे मच्छीचे प्रमाण कमी झाले आहे. या वातावरणात मच्छी खोल समुद्रात जात असल्याने मच्छीमारांना मच्छी मिळत नाही, अशी प्रतिक्रिया मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अभयसिंग इनामदार यांनी व्यक्त केली आहे.
भाव कडाडले
मच्छीचे उत्पादन घटल्यामुळे भाव मात्र कडाडले आहेत. पापलेट पूर्वी 600 ते 700 ला मिळत होते ते आता 1500 रुपये भावाने मिळत आहे. 400 ते 500 रुपये दराने मिळणारी सुरमई दीड ते दोन हजारांवर गेली आहे. ओला जवळाही ग्राहकांच्या आवाक्याबाहेर चालला आहे.





























































