
>> सुजीत पाटकर
सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे विवाह संस्था आणि त्याबद्दलचा विचारप्रवाह बदलत आहे. नात्यांमधला ओलावा, काळजी तर कमी होत आहेच, पण नाते टिकवण्यासाठी जी धडपड केली जात असे तीदेखील कमी होत आहे. व्यक्तिगत अहंकार कमालीचा वाढला असून तडजोडीची वृत्ती कमी होत आहे. याला फक्त बदलत्या काळाचा महिमा किंवा अपरिहार्य दुष्परिणाम म्हणून सोडून द्यायचे का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. सोशल मीडिया नावाच्या वादळात सध्या आपली विवाह संस्था आणि कौटुंबिक जीवन हेलकावे खात आहे. हे वादळ भविष्यात आपल्याला कोणत्या वळणावर नेईल हे येणारा काळच ठरवेल.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
कधी दोन मनांचं मीलन असतं
तर कधी दोन जिवांचं भांडण असतं
एकानं विस्कटलं तरी दुसऱयानं आवरायचं असतं
संकटाच्या वादळाला दारातच थोपवायचं असतं
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
प्रेमाचं ते बंधन असतं
घराचं ते घरपण असतं
विधात्यानं साकारलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं
विवाह संस्थेविषयी अत्यंत मार्मिकपणे वरील काव्यात वर्णन केले आहे. खरे म्हणजे लग्न हे एक पवित्र बंधन असतं. नात्यातलं मांगल्य विवाह संस्थेतूनच राखता येतं. त्यामुळेच आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीत विवाह संस्थेला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. शतकानुशतके विवाह संस्थेचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न समाजपातळीवर झाला आहे. अलीकडे मात्र ही विवाह संस्था मोडीत निघते की काय अशी भीती वाटावी अशा अनेक गोष्टी घडत आहेत. कौटुंबिक व सामाजिक वातावरण बदलले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान झपाटय़ाने नवनवीन क्षितिजे पादाक्रांत करीत आहेत. आजची गोष्ट उद्या ऐतिहासिक व्हावी एवढा या बदलांचा वेग आहे. या सर्व घडामोडींचे परिणाम आणि दुष्परिणाम समाजाच्या सर्वच अंगांवर झाले आहेत. विवाह संस्था त्यापासून वेगळी कशी राहील? विवाह संस्थेचे अस्तित्त्वच पणाला लागले आहे.
मुळात विवाह संस्थेकडून असणाऱया अपेक्षा आणि पती आणि पत्नी यांच्या एकमेकांकडून असणाऱया अपेक्षांचे स्वरूपच गेल्या काही वर्षांत बदलले आहे, बदलत आहे. त्यासाठी वाढलेला आर्थिक स्तर आणि विकास तर जबाबदार आहेच, मात्र त्याहीपेक्षा प्रत्येकाच्या मानगुटीवर बसलेले सोशल मीडिया नावाचे भूतही कारणीभूत आहे. हे भूत उतरायला हवे असे सगळेच म्हणत असले तरी ते दिवसेंदिवस जास्तच पक्के होत चालले आहे. तरुण पिढी तर सोशल मीडियाच्या मायाजालात किंवा आजच्या भाषेत आभासी जगात जास्तच गुंतत चालली आहे. त्यामुळे जोडीदाराबद्दल अवाजवी भ्रामक अपेक्षा केल्या जात आहेत.
पूर्वीच्या काळी लग्नासाठी चांगला वर किंवा चांगली वधू इतकीच माफक अपेक्षा असायची. विवाहपद्धती ही कुटुंब, नाती, त्याग, समजूतदारपणा अशा तत्त्वांवर आधारलेली होती, परंतु आता या तत्त्वांची जागा भौतिक सुख देणाऱया गोष्टींनी घेतली आहे. जोडीदाराच्या स्वभावापेक्षा तो किंवा ती किती पैसा कमवते, त्याची संपत्ती आणि मालमत्ता किती आहे, एकमेकांशी शारीरिकदृष्टय़ा कितपत जुळवून घेऊ शकतो या गोष्टींना अवाजवी महत्त्व मिळायला लागले आहे. बदललेल्या काळाच्या दृष्टीने या सर्व गोष्टी दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत हे मान्य केले तरी त्यांना दिले जाणारे अवाजवी महत्त्व विवाह संस्थेच्या मुळावर आले आहे.
हिंदुस्थानात सोशल मीडियाचा वाढता वापर धक्कादायक म्हणता येईल एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. व्हॉटस्ऍप या सोशल साइटमध्ये सर्वात जास्त गुंतलेले लोक हिंदुस्थानी आहेत असे एका सर्व्हेमध्ये अलीकडेच दिसून आले आहे. आपल्याकडे प्रत्येक पाच माणसांपैकी तीन लोक व्हॉटस्ऍपचा वापर करतात. फेसबुकबाबतसुद्धा असेच आकडे आहेत. 90 टक्के पुरुष तर 82 टक्के स्त्र्ाया हे ऑप्लिकेशन त्यांच्या मोबाईलमध्ये वापरतात. सोशल मीडियाचा प्रचंड वापर आणि त्याचा माणसांवर होणारा गंभीर परिणाम याचा अंदाज या आकडेवारीवरून सहज बांधता येतो. एक गोष्ट खरी की, तंत्रज्ञानातील वेगवान प्रगती आणि सोशल मीडिया यामुळे जग जवळ आले आहे. जगातल्या कुठल्याही कोपऱयातल्या कोणत्याही माणसाशी त्यामुळे संवाद साधता येणे सोपे झाले आहे. म्हटले तर ही खूपच फायद्याची गोष्ट आहे. मात्र त्याचवेळी या प्रगतीचे समाजावर होणारे भयंकर दुष्परिणाम पाहिले की ही गोष्ट फायद्याची की तोटय़ाची यावर विचार करणे आवश्यक ठरले आहे.
अलीकडेच मुंबईत 500 लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्यात असे दिसून आले की, 40 टक्के विवाहित लोक अनैतिक संबंधांमध्ये गुंतलेले आहेत. वैवाहिक जोडीदाराकडून अपुऱया प्रमाणात मिळणारे प्रेम आणि आपुलकी तसेच सततचा तणाव, नैराश्य आणि वाढते गैरसमज अशी अनेक कारणे यासाठी देण्यात आली. अनैतिक संबंध मान्य करणाऱया या 40 टक्के लोकांमध्ये 28 टक्के पुरुष तर 12 टक्के स्त्र्ाया आहेत. त्यात सर्वोच्च न्यायालयाने कलम 497 नाकारून व्यभिचाराला गुन्हा ठरवता येणार नसल्याचे जाहीर केले. आधीच वेगवेगळय़ा कारणांमुळे, त्यात सोशल मीडियाही आला, कौटुंबिक आणि वैवाहिक संबंधांमध्ये दरी निर्माण होत आहे. त्यात अशा निकालांमुळे ही दरी आणखी रुंद होणार हे उघड आले. त्यातून पुन्हा घटस्फोटाचे प्रकार वाढणार आणि या सर्व भांडणात लहान मुले विनाकारण भरडली जाणार. प्रसिद्ध वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या आभा सिंग यांनी याच कारणावरून या निकालाविरोधात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार जर जोडप्यातल्या एका व्यक्तीने व्यभिचार केला तर ते वेगळे होऊ शकतात, पण व्यभिचाराला गुन्हा म्हणून बघता येऊ शकत नाही. शिवाय असे केल्याने घटस्फोटाच्या संख्येत वाढ होईल असे सांगणारा कोणताही सर्व्हे उपलब्ध नाही. हा दृष्टिकोन कायद्याच्या दृष्टीने कदाचित बरोबर असेलही मात्र त्याचे गंभीर परिणाम विवाह संस्थेवर होणार आहेत हे निश्चित. या निर्णयाचे नेमके काय पडसाद हिंदुस्थानी समाजव्यवस्थेवर आणि कुटुंबव्यवस्थेवर उमटतात हे येणारा काळच सांगेल. मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक ही मुस्लिम समाजातील घटस्फोटाची अन्यायकारक रूढीसुद्धा नाकारली आणि तिहेरी तलाक असंवैधानिक ठरवला. याबाबतचे इतर राजकीय मुद्दे सोडून दिले तरी हे पाऊल मुस्लिम महिलांच्या आणि एकूणच विवाहपद्धतीच्या सबलीकरणाच्या दृष्टीने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल म्हणता येईल.
एकूणच सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे विवाह संस्था आणि त्याबद्दलचा विचारप्रवाह बदलत आहे. नात्यांमधला ओलावा, काळजी तर कमी होत आहेच, पण नाते टिकवण्यासाठी जी धडपड केली जात असे तीदेखील कमी होत आहे. व्यक्तिगत अहंकार कमालीचा वाढला असून तडजोडीची वृत्ती कमी होत आहे. याला फक्त बदलत्या काळाचा महिमा किंवा अपरिहार्य दुष्परिणाम म्हणून सोडून द्यायचे का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. सामाजिक व कौटुंबिक जीवनात तसेच विवाह संस्थेत उठलेले सोशल मीडिया नावाचे वादळ भविष्यात आपल्याला कोणत्या वळणावर नेईल हे येणारा काळच ठरवेल.
वाढते घटस्फोट
सोशल मीडिया हा सध्याच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे. साहजिकच त्यावर व्हायरल होणाऱया संदेशांचा पगडा मानवी मनावर बसत आहे. सोशल मीडियामध्ये प्रतिबिंबीत होणारे ‘आदर्श आयुष्य’ जगावं असं प्रत्येकाला वाटू लागलेय. जर तसे मिळत नसेल तर तडजोड करून ते मिळवण्यापेक्षा टोकाची भूमिका घेऊन अंगी असणाऱया चांगल्या गोष्टींनासुद्धा नावं ठेवायचा नवा ट्रेंड सध्याच्या पिढीत दिसत आहे. हीच गोष्ट विवाह संस्था विस्कळीत व्हायला कारणीभूत ठरत आहे. जोडीने यशस्वी आयुष्य जगण्यासाठी जी तडजोड आवश्यक असते तीच आता कमी होत आहे. त्याचा परिणाम म्हणूनच घटस्फोटांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. एका माहितीनुसार मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये घटस्फोट वाढले आहेत. सध्या साधारण 40 टक्के वैवाहिक जीवनाचा शेवट घटस्फोटात होत आहे. वांद्रय़ाच्या फॅमिली कोर्टात दर महिन्याला एक हजार घटस्फोटांचे अर्ज दाखल होतात. बरेच समुपदेशक आणि मध्यस्थ असूनही त्यांची संख्या अपुरी पडत आहे. एवढे या अर्जांचे प्रमाण वाढत आहे. शिवाय त्यातील अनेक प्रकरणांमध्ये मुलाचा हक्क या प्रश्नाचा गैरवापर केला जातो.
– [email protected]
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ञ आहेत.)





























































