चंद्रपूरमध्ये दरड कोसळून दोन मजुरांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील आसोलामेंढा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातील पाणी शेतीकडे वळवण्याचे काम सुरू असताना दरड कोसळून दोन मजुरांचा मृत्यू झाला. रवी उईके (35) आणि हरिदास मनोहर दुधबळे( 42) मृतांची नावे आहेत तर गजानन मुर्लीधर मेश्राम (45) या मजुराला गंभीर दुखापत झाल्याने त्याला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचाराकरीता भरती करण्यात आले. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली.

विदर्भ पाटबंधारे विभागामार्फत सावली तालुक्यातील आसोलामेंढा सिंचन प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातील पाणी भूमिगत पाईपलाईद्वारे चिचाळा आणि लगतच्या सहा गावातील शेतीला पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू आहे. या कामात चिचाळा येथील मजूर लावण्यात आले. शनिवारी सकाळी जमिनीतील खोदलेल्या खड्ड्यात दोन पाईप जोडून वेल्डिंग करीत असताना अचानकपणे दरड कोसळून तीन मजुरांपैकी दोघे मातीचा ढिगाऱ्याखाली दबले गेले. यात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे.

सदर घटनेबाबत कंत्राटदार कंपनीचे व्यवस्थापक प्रशांत राठोड यांच्याशी संपर्क केला असता सदर घटनेत मृत्यु पावलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील शासनाकडुन मदत देण्यात येणार असल्याचे सांगितले.