मेळघाट अॅक्शन प्लॅन राबवून बालमृत्यूचे प्रमाण रोखणार! आरोग्यमंत्र्यांची ग्वाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मेळघाटातील बालमृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली असून आरोग्य व्यवस्थेबरोबरच वीज, रस्ते, संपर्क यंत्रणेचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. पोषण आहारासाठी मेळघाट कृती आराखडा तयार केल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मेळघाटातील बालमृत्यू रोखण्यासाठी करावयाच्या उपायांचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दोन दिवसाचा मेळघाट दौरा केला. या दौऱयात आरोग्यमंत्र्यांनी सेमाडोह, हरिसाल, धारणी, बैरागड, रंगुबेली, चिखलदरा, सलोना, काटकुंभ, अचलपूर येथील आरोग्य केंद्रांना भेटी देत तेथील सुविधांची पाहणी, डॉक्टर व कर्मचाऱयांशी चर्चा आणि रुग्णांची विचारपूस केली.

पायाभूत सुविधांचा विकास
आरोग्यमंत्री शिंदे म्हणाले, मेळघाटात पायाभूत सुविधांचा विकास होणे गरजेचे आहे. तसेच रुग्ण आणि आरोग्य यंत्रणेतील संपर्क हा देखील मोठा प्रश्न आहे. संपर्काअभावी कमी अंतरावरील रुग्णांना देखील आरोग्य सुविधा पुरविण्यात अडचणी येत आहे. यावर मोबाईल किंवा वायरलेस यंत्रणा उभारण्याबाबत विचार व्हावा. दुर्गम भागात तज्ञ डॉक्टरांची सेवा मिळावी यासाठी ग्रामीण रुग्णालयस्तरावर शिबीर घेण्यात येतील. पावसाळ्याच्या काळात शिबिराचा लाभ होत असल्याने त्या ठिकाणी डॉक्टरांच्या राहण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

वन विभागाची संपर्क यंत्रणा
दुर्गम भागात जिथे संपर्क यंत्रणा नाही तेथे रुग्णवाहिकेला बोलावण्यासाठी वनविभागाच्या संपर्क यंत्रणेचा वापर करण्याच्या सूचनाही दिल्या. या भागातील नागरिकांचे हिमोग्लोबीन प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी डोस देण्यात यावेत. दुर्गम भागातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी नेब्युलायझर, वार्मर आदींचे वाटप करण्यात आले आहे. अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, आशा यांच्या मदतीने एकत्रित येऊन समन्वयाने कार्य केल्यास कुपोषण, बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

बाईक ऍम्ब्युलन्स
मेळघाटात मोठय़ा रुग्णवाहिकेपेक्षा बाईक ऍम्ब्युलन्सप्रभावी ठरू शकतील. यासाठी आवश्यक तेवढय़ा बाईक ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रंगूबेली येथे तातडीने बाईक ऍम्ब्युलन्स पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.