
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
जैश-ए-मोहमद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने दोन संशयितांना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असून चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होत आहे. यातील एका दहशतवादी जैश-ए-मोहम्मदसाठी काम करत असल्याचे समोर आले असून पुलवामा हल्ल्यावेळी त्याने ब्लॅकबेरीच्या बीबीएम सेवेद्वार दहशतवाद्यांना मेसेज पाठवल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. शहनवाज अहमद तेली असे त्याचे नाव असून दुसऱ्या संशयिताचे नाव आकीब अहमद असे आहे.
या दोघांना शुक्रवारी उत्तर प्रदेशमधील देवबंद येथून अटक करण्यात आली होती. यावेळी या दोघांच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्सही काढण्यात आले. त्यात या दोघांचा पुलवामा हल्ल्याशी संबंध असल्याचे समोर आले. हे दोघेही आभासी (व्हर्चुअल) क्रमांक वापरत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. या दोघांकडे ब्लॅकबेरी मोबाईल असून त्यात त्यांनी प्ले स्टोरवर उपलब्ध नसलेले अॅप डाऊनलोड केल्याचेही समोर आले. त्यावरूनच ते इतर दहशतवाद्यांना मेसेज पाठवायचे. तोच धागा पकडून पोलिसांना आता शोध सुरू केला आहे. मोबाईलमधील याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी आता संशयितांची धरपकड सुरू केल्याने जैशचे धाबे मात्र दणाणले आहेत. पुलवामा हल्ल्यात शहनवाज बरोबर इतर काही दहशतवाद्यांचाही समावेश होता, असे मेसेज या मोबाईलमधून पोलिसांच्या हाती लागले आहे.
देवबंद येथील सहारनपूर मधून या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याजवळून 32 बोरची एक गन आणि काही जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. हे दोघे देवबंदची कुठलीही स्वीकृती घेऊन राहत नव्हते. त्यांच्याजवळ इस्लामशी संबंधित ऑडिओ-व्हिडीओ कॅसेटही जप्त करण्यात आल्या.
दरम्यान, शहनवाज अहमद जम्मू-कश्मीरमधील कुलगामचा असून आकीब पुलवामा येथे राहतो. यामुळे या दोघांचा पुलवामा हल्ल्याशी संबंध असल्याच्या शक्यताही वाढल्या आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीत शहनवाज कश्मीरी तरुणांचे ब्रेन वॉश करून त्यांना जैशमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम करत असल्याचे समोर आले असून तो ग्रेनेड एक्सपर्ट असल्याचही सांगण्यात येत आहे.


























































