अवैध वाळूवाहतूक प्रकरणी पकडलेले दोन डंपर आणि 1 ट्रॅक्टर गायब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहुरी

राहुरी महसूलच्या आवारातून अवैध वाळूवाहतूक प्रकरणी पकडलेले 2 डंपर व 1 ट्रॅक्टर ही तीन वाहने गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या ताब्यातील वाहने गायब होण्याच्या या प्रकरणाने महसूलचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. राहुरी तहसिलच्या आवारातून वाहने गायब होण्याची ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. मात्र, बुधवारी सायंकाळपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.राहुरीच्या मुळा नदीपात्रातील वाळूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी महसूल विभागाने कारवाई करून कार्यालयाच्या प्रांगणात ही वाहने ठेवली होती. बुधवारी सकाळी तहसिलच्या आवारातून वाहने गायब झाल्याचे दिसून आल्याने राहुरीचे महसूल प्रशासन खडबडून जागे झाले. शासकीय कामानिमित्त तालुक्यातील नागरिकांची तहसिल व पोलीस ठाण्यात ये-जा असल्याने गायब झालेल्या वाहनांची दिवसभर राहुरीत चर्चा होती.