आयएसआयविरोधात सर्वंकष कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिगेडियर हेमंत महाजन << [email protected]>>

ज्या वेळेला दहशतवादी हल्ला होतो त्या वेळेला कमीत कमी आठ ते दहा समर्थक त्यांना मदत करतात. म्हणून दहशतवाद संपवायचा असेल तर दहशतवाद्यांना मारण्याच्या शिवाय त्यांना मदत करणाऱयांवर, तसेच हुरियत कॉन्फरन्सवर अजून सक्त कारवाई करण्याची गरज आहे. शिवाय या सर्व दहशतवादामागे असलेल्या पाकिस्तानी आयएसआयविरोधातही आपण सर्वंकष कारवाई करायला हवी. किंबहुना ती अनेक महिने चालू ठेवली तर नक्कीच दहशतवादी विरोधी लढाईमध्ये आपल्याला यश मिळू शकेल.

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याला ब्लॅक लिस्ट करा, अशा मागणीचा प्रस्ताव फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीसमोर मांडला आहे. पाकिस्तानचा दहशतवादी मसूद अजहर आणि त्याच्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेवर बंदी घालण्यासाठी हिंदुस्थानकडून बऱ्याच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. आता या प्रयत्नाला अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनची साथ मिळाली आहे. या तिन्ही शक्तिशाली देशांनी आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जैशचा प्रमुख मसूद अजहरवर बंदीचा नवा प्रस्ताव दिला आहे. मसूद अजहरची संपत्ती जप्त करणे, शस्त्र बंदी आणि प्रवासबंदी घालण्याची मागणी या देशांनी केली आहे. 15 सदस्यीय सुरक्षा परिषदेमध्ये हा प्रस्ताव ठेवला गेला. या प्रस्तावात पुलवामा हल्ल्याचादेखील उल्लेख केला आहे.

अमेरिका, फ्रान्स, इस्रायल, इंग्लंड अशी अनेक राष्ट्रे हिंदुस्थानच्या बाजूने ठाम उभी आहेत. हिंदुस्थानकडे पाकिस्तानविरोधात ढीगभर पुरावे आहेत. ते पाकिस्तानला मान्य नसले तरी जगासमोर हे पुरावे सादर करण्याची चांगली संधी हिंदुस्थानला मिळाली आहे. म्हणूनच पाकची राजकीय पातळीवर कोंडी करतानाच त्यांना लष्करी पातळीवर शिक्षा देण्याचे कामही सुरू ठेवायला हवे. हिंदुस्थानने केलेल्या डिप्लोमॅटिक ऑफेन्सिव्हमुळे पाकिस्तान नक्कीच जगामध्ये वेगळा पडलेला आहे. जगाच्या मोठय़ा राष्ट्रांचा वापर करून जैश-ए-मोहम्मद व इतर दहशतवादी गटांना जागतिक दहशतवादी घोषित केले जावे. याशिवाय पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित केले जावे ज्यामुळे सगळे जग त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार घालून त्यांना वाळीत टाकतील.

एक आनंदाची बाब अशी आहे की, ज्या वेळेला पाकिस्तानच्या विरुद्ध आपले युद्ध सीमेवर सुरू आहे त्याच वेळेला कश्मीर खोऱयांमध्ये दहशतवादी विरोधी अभियान सुरू आहे व अजून दोन दहशतवादी मारण्यात आपल्याला यश मिळाले आहे. अभियान अजून जास्त तेज करण्याची गरज आहे. एवढेच नव्हे तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने कश्मीर खोऱयांमध्ये दहशतवादी समर्थकांच्या घरी धाडी टाकून त्यांना अटक केली आहे. ज्या वेळेला दहशतवादी हल्ला होतो त्या वेळेला कमीत कमी आठ ते दहा समर्थक त्यांना मदत करतात. म्हणून दहशतवाद संपवायचा असेल तर दहशतवाद्यांना मारण्याच्या शिवाय त्यांना मदत करणाऱयांवर, तसेच हुरियत कॉन्फरन्सवर अजून सक्त कारवाई करण्याची गरज आहे. आपण बहुआयामी कारवाई अजून अनेक महिने चालू ठेवले तर नक्कीच दहशतवादी विरोधी लढाईमध्ये आपल्याला यश मिळू शकेल.

हिंदुस्थानी सैन्याविषयीची संवेदनशील माहिती काढणे (सिक्युरिटी ऑफ इन्फर्मेशन), नागरिकांना दुष्कृत्य करण्यास प्रवृत्त करणे (सबव्हर्शन) आणि हिंदुस्थानच्या राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान (सॅबोटाज) या तीन पातळ्यांवर पाकिस्तानी आयएसआय सध्या आपल्या देशाला धोका पोहोचवत आहे.

आपल्या एजंटामार्फत ते बेरोजगार तरुणांना जाळ्यात ओढतात. धर्माचे/पैशाचे आमीष दाखवून दहशतवादी कृत्य करण्यास प्रवृत्त केले जाते. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ सीमेवरील अनेक मदरशांचा वापर उग्रवादाचा प्रसार करण्याकरता केला जातो. एका अंदाजाप्रमाणे हिंदुस्थानात 100 ते 150 दहशतवादी सेल असावेत, ज्यांना विविध प्रकारची दहशतवादी कृत्ये करण्यास प्रवृत्त केले जाते. प्रत्येक वर्षी 20 ते 25 अशा प्रकारच्या सेलचा छडा लावून बरबाद केले जाते. मात्र त्यांच्या जागी अजून नवीन सेल तयार केले जातात. या प्रत्येक सेलमध्ये पाच ते दहा दहशतवादी प्रवृत्तीचे युवक असू शकतात. मग ते आयएसआयच्या इशाऱ्यावरून विविध दहशतवादी कारवाया करत असतात. 2018 मध्ये नॅशनल इन्व्हेटिगेशन एजन्सीने अनेक हिंदुस्थानी आयसीस दहशतवाद्यांना अटक केली आहे. आज आयएसआयने आपल्या देशातील कॅन्टोन्मेंट किंवा मोठय़ा शस्त्र बनवणाऱ्या फॅक्टरीच्या आसपास आपल्या हस्तकांना बसवले आहे. आपल्या गुप्तचर यंत्रणा/सुरक्षा यंत्रणा ढिल्या झाल्या की आत प्रवेश करून मोठी घातपाताची कामे ते करतात.

देशाचा तीन पातळीवर बचाव करावा लागेल. राष्ट्राची गुप्त माहिती सुरक्षित ठेवावी लागेल त्यासाठी सायबर सुरक्षा, दूरध्वनीवरील संभाषण शत्रूच्या कानी पडू नये म्हणून प्रयत्न, कॉम्प्युटरवरील माहितीचे संरक्षण, विविध सरकारी कार्यालयांतील महत्त्वाच्या कागदपत्राचे संरक्षण करावे लागेल. कोणी देशद्रोही नागरिक जर ही माहिती विकायचा प्रयत्न करत असेल तर त्याला पकडावे लागेल. याशिवाय सबव्हर्शन म्हणजे युवकांचे मनपरिवर्तन करून त्यांना दहशतवादी कृत्य करण्यास भाग पाडणे. अशा युवकांवरही लक्ष ठेवावे लागेल. कुठलाही युवक जिहादी किंवा अति डाव्या विचारसरणीच्या प्रभावाखाली येत असेल किंवा दहशतवादी संघटनेत सामील होत असेल किंवा अशा प्रकारचे कृत्य करण्यास प्रवृत्त होत असेल तर त्याला थांबवावे लागेल. पूर्ण देशावरती लक्ष ठेवणे कोणत्याही गुप्तचर यंत्रणेला शक्य नाही. त्यामुळे सामान्य जनतेने आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे यावर नजर ठेवणे गरजेचे आहे. आपले खरे शत्रू चीन, पाकिस्तान, बांगलादेश, डावे दहशतवादी/नक्षलवादी, जिहादी दहशतवादी आणि काही हिंदुस्थानविरोधी संस्था आणि हिंदुस्थानविरोधी नागरिक आहेत. मात्र त्याविरोधात सर्व देश एकत्र आल्यास आपण देशासमोरील बहुआयामी धोक्यांना उत्तर देण्यास समर्थ होऊ शकतो. आपसातील मतभेद कमी करून देशवासीयांनी शत्रूवर नजर ठेवण्यास मदत करावी. राजकीय इच्छाशक्ती असल्यास आणि मतपेटीचे राजकारण दूर ठेवल्यास आयएसआयला ताळ्यावर आणणे शक्य आहे.