टिवल्या-बावल्या : टोपी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरीष कणेकर

[email protected]

मी बाजारात जाऊन टोपी विकत आणली. साधी आपली टोपीसारखी टोपी. मला ती आपल्याकडच्या बँकांना घालायची होती. नंतर मी इंग्लंडला पळून जाणार होतो. संगीतकार नदीमही तिकडेच (पळून) गेलाय. आपला फरुख इंजिनीयरही तिथेच आहे, पण तो पळूनबिळून गेलेला नाही. चांगला राजरोस गेलाय. या पळून गेलेल्यांचा एक क्रिकेट संघ बनू शकेल का? न पळून गेलेला इंजिनीयर कर्णधार, विजय मल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी, नदीम हे मातब्बर खेळाडू असलेल्या संघाला कोणाची भीती? तिहार जेलमधल्या कैद्यांनाही ते चारीमुंडय़ा चीत करतील, पण आधी मला थोडी चौकशी करायची आहे. एकच टोपी सगळय़ा बँकांना चालते की वेगवेगळय़ा बँकांना वेगवेगळय़ा टोप्या लागतात हे मला जाणून घ्यायचंय. टोप्या परत देतात की बँकवाले त्यांच्या लॉकरमध्ये ठेवतात हेही कळू शकलेले नाही. वारंवार टोप्या विकत घेणे परवडणारे नाही.  शिवाय त्या दुसऱ्याला घालायच्या असल्यामुळे  माझ्या मापानं घेऊन कसं चालेल? याचा अर्थ विविध बँकांना आधी सदिच्छा भेट देऊन टोपीसाठी त्यांच्या डोक्यांची ‘मेजरमेंटस्’ घ्यावी लागतील. एखाद्या मॅनेजरची बदली झाली तर सर्व खटाटोप पुन्हा करावा लागेल. विजय मल्ल्यामुळे टोपी घालणं सोपं आहे असं मला वाटलं होतं, पण ते एक शास्त्र आहे, ती एक कला आहे. शास्त्रज्ञ व कलाकार विजय मल्ल्या यांच्याविषयी आपण योग्य तो आदर दाखवत नाही. प्रत्येक बँकेनं वास्तविक त्याचा एखादा कुर्रेबाज फोटो बँकेत भिंतीवर लावायला हवा. सगळय़ा स्टाफने बँकेत आल्या आल्या मल्ल्याची ओवाळून पूजा करायची व मग शिस्तबद्धपणे आपापली टोपी घालायची.

‘किंगफिशर’ एअरलाइन्स उडती ठेवण्यासाठी मल्ल्यानं म्हणे विविध बँकांकडून अमाप (पक्षीः वारेमाप) कर्जे घेतली. मला पाव किलो साजूक तूप विकत घेण्यासाठी बँकेकडून एकशे पासष्ट रुपयांचे कर्ज हवं होतं (‘खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी’ हे माझं ब्रीद होतं). हातातल्या टोपीशी चाळा करीत मी बँक मॅनेजरपाशी कर्जाचा प्रस्ताव मांडला. आमच्यात पुढीलप्रमाणे संवाद झाला –

मॅनेजर ः तुम्हाला तुपासाठी कर्ज हवंय कशावरून?

मी ः कर्ज मिळालं की, मी ते विकत घेऊन दाखवू शकतो.

मॅनेजर ः कर्ज देण्याआधीच तूप दाखवावं लागेल. तुम्ही एक चमचा तूप बँकेत आणून दाखवा.

मी ः नुसतं बघून ते साजूक तूप आहे हे तुम्ही कसं ओळखणार?

मॅनेजर ः नुसतं बघून नाही, चाखून. मी, असिस्टंट मॅनेजर व ‘लोन डिपार्टमेंट’चा तिघांचा स्टाफ एकेक चमचा तूप खाऊन बघू. चमचा परत मिळणार नाही. जमल्यास डब्यातून वरणभात आणावा. त्यावर आम्ही ते घालू.

मी ः पुरणपोळी आणली तर चालेल का?

मॅनेजर ः हो चालेल, पण त्यासाठी एक चमचा तूप पुरणार नाही. कर्ज काढून घेतलेले सगळेच तूप तुम्हाला आमच्या पुरणपोळय़ांवर ओतायला लागेल.

मी ः तुम्ही तुमच्याच पोळीवर तूप ओढून घेता असं मी ऐकलंय.

मॅनेजर ः झूट आहे सगळं. आमचा उत्कर्ष न बघवणाऱ्या आमच्या हितशत्रूंनी केलेले हे बिनबुडाचे आरोप आहेत. आमच्या स्टाफवरचे अनेक जण तुपाशी नाहीतर दुधाशी पुरणपोळी खातात. तुम्ही पुरणपोळी आणून बघा.

त्यानंतर मॅनेजरनं मला बाहेरच्या काऊंटरवरून सत्तावीस फॉर्म घ्यायला सांगितले. त्यातला एक कानडीतून होता. तो भरायचा मात्र इंग्रजीतून होता. कर्जासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची मला एक यादीच देण्यात आली. ती अशी

1) आधारकार्ड,

2) पासपोर्ट,

3) रेशनकार्ड,

4) पॅनकार्ड,

5) निवडणूक कार्ड,

6) ज्येष्ठ नागरिक कार्ड,

7) मुंबईत किती काळ वास्तव्य आहे त्याचा पुरावा,

8) यापूर्वी कुठून कर्ज न घेतल्याचा खासदाराच्या सहीनिशी पुरावा,

9) गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचा किमान पाच वर्षे गजाआड काढलेल्या गुंडाच्या सहीनिशी/अंगठय़ानिशी शिफारसपत्र,

10) तूप खाल्ल्याने तब्येतीची  होत नाही असे ठामपणे सांगणाऱ्या सरकारी इस्पितळातील ज्येष्ठ डॉक्टरची व्हिडीओ फिल्म,

11) तुम्ही तूप खाऊन धुडगूस घालत नाही याबाबत तुमच्या पत्नीची, मुलांची व शेजाऱ्यापाजाऱयांची साक्ष,

12) तुम्ही कर्ज फेडाल याची गॅरंटी तुमचा गडी, मोलकरीण, धोबी किंवा कुत्राही देऊ शकतो.

एवढं ‘प्रोसिजर’ (पक्षी ः कर्मकटकट) पूर्ण करून तुपाचा थेंब माझ्या तोंडात पडेपर्यंत मी आडवाणींच्या वयाचा झालो असतो. विजय मल्ल्यानं बहुधा प्राथमिक शाळेत असतानाच कर्जाची प्रक्रिया सुरू केली असावी. तेव्हा कुठे आता त्याच्या हातात पैसे पडले असावेत. याला दूरदृष्टी म्हणतात. नाहीतर आमच्या लग्नात आम्ही मांडव व भटजीही दुसऱ्याचे वापरून घेतले होते. म्हणजे एका जोडप्याचे लग्न लागलं नाही, तर त्यांना ढकलून आम्ही बसलो होतो. सगळं होईपर्यंत डोक्यावरचा मांडवही काढला गेला होता आणि लग्न लावणारा भटजीही सोवळय़ातच पळत सुटला होता. त्याची दक्षिणा वाचली हा आनंद आजही मनात ताजा आहे.

माझं कर्ज बोंबललं, पण माझी नवसाची टोपी अनाथ झाल्येय. ती माझ्या डोळय़ांना सवतीच्या मुलासारखी सलते, काय करावं त्या टोपीचं? आयडिया, ‘हीच ती विजय मल्ल्यानं बँकांना घातलेली टोपी’ अशी जाहिरात करून मी ती जादूची टोपी कित्येक लाखांना विकू का? त्यानं घरात मी पिंपच्या पिंप साजूक तूप भरून ठेवीन.