INDvAUS धोनी-जाधवची ‘फिनिशर’ खेळी, हिंदुस्थानची मालिकेत आघाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हैदराबाद

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या पहिल्या एक दिवसीय सामन्यात हिंदुस्थानने पाहुण्या ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने दिलेले 237 धावांचे लक्ष्य हिंदुस्थानने चार गड्यांच्या मोबदल्यात 49.4 षटकात गाठले. हिंदुस्थानकडून एम.एस. धोनी आणि केदार जाधवने फिनिशर खेळी केली. दोघांनी 141 धावांची अभेद्य भागिदारी केली. जाधवने नाबाद 81 धावा आणि धोनीने नाबाद 59 धावा केल्या. या विजयासाह हिंदुस्थानने पाच एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली.

धोनीचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम, ‘हिटमॅन’ रोहितला केले ओव्हरटेक

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन शून्यावर माघारी परतला. यानंतर रोहित आणि कर्णधार विराटमध्ये चांगली भागिदारी झाली. परंतु दोघेही अर्धशतकाच्या जवळ येऊन बाद झाले. रोहितने 37 तर विराटने 44 धावा केल्या. यानंतर रायडूही 13 धावांवर बाद झाला.

शंभर धावांमध्ये चार गडी बाद झाल्याने संकटात सापडलेला डाव केदार जाधव आणि अनुभवी धोनीने सावरला. आधी हळूहळू खेळत आणि नंतर खराब चेंडूवर जोरदार फटका खेळत दोघांनी धावा जमवल्या. या दरम्यान, केदार जाधवने एक दिवसीय कारकीर्दीतील पाचवे अर्धशतक झळकावले. त्यापाठोपाठ धोनीने देखील एक दिवसीय क्रिकेटमधील 71 वे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 11 वे अर्धशतक झळकावले. दोघांनीही नाबाद राहात हिंदुस्थानला विजय मिळवून दिला.

त्याआधी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने उस्मा ख्वाजाचे अर्धशतक आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या छोट्या खेळीमुळे 50 षटकात 236 पर्यंत मजल मारली. हिंदुस्थानकडून वेगवान गोलंदाज बुमराह आणि शमीने प्रत्येकी दोन बळी घेतले, तर कुलदीपनेही दोन बळी घेतले, केदार जाधवला एक बळी मिळाला.