
>> जयेश राणे
आपण आपल्या देशाचा आणि देशावर वर्षानुवर्षे घोंघावत असणार्या जिहादी संकटाचा गांभीर्याने विचार करूया. देशावर संकट म्हणजे माझ्यावरचे संकट हा विचार मनात पक्का ठेवून या संकटाला एकजुटीने तोंड देऊ. तसेच शत्रूला धूळ चारण्यासाठी तिन्ही सैन्य दलांची आर्थिक बाजू भक्कम करूच, पण त्यांच्यासाठी वेळदेखील देऊ! देशाच्या तिन्ही सैन्य दलांचा पसारा मोठा आहे. तो सांभाळण्यासाठी प्रचंड प्रमाणावर आर्थिक तरतूदही करावी लागते. सगळी सोंगं करता येतात, पण पैशांचे सोंग करता येत नाही. त्यामुळे सैन्यासाठी पैसा उभा करण्यासाठी कुठे कुठे बचत केली जाऊ शकते ते पाहिले पाहिजे आणि त्याप्रमाणे कृतीही केली पाहिजे.
‘भारत के वीर’ (bharatkeveer.gov.in) या संकेतस्थळाच्या माध्यमातून पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या सैनिकांसाठी आर्थिक मदतीचा अखंड ओघ वाहत आहे. त्यामध्ये सामान्य नागरिक तसेच काही चित्रपट कलाकार, क्रिकेटर यांचाही सहभाग आहे. नागरिकांनी सैनिकांना सहाय्य करण्यासाठी घेतलेला पुढाकार नोंद घेण्यासारखा आहे. मात्र आर्थिक सहाय्य करण्यासह सैन्यासाठी वेळही देणे आवश्यक आहे. रजा काढून, रजेच्या दिवशी आपण कित्येक वैयक्तिक गोष्टी करत असतो. त्यातूनच वेळ काढून देशसेवेच्या कार्यातही सहभागी झाले पाहिजे. त्यासाठीही नागरिकांनी पाऊल टाकले पाहिजे.
‘भारत के वीर’ हे सैनिकांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी एकमेव अधिकृत संकेतस्थळ आहे. त्याचा उपयोग नागरिकांनी करावा. चांगल्या गोष्टी करत असताना त्यात ‘खो’ घालणारे नतद्रष्टही असतातच. सोशल मीडियावर काही बँक अकाऊंट नंबर वेगाने प्रसारित होत आहेत. त्या पोस्टना बळी न पडता योग्य त्याच ठिकाणी आपले धन अर्पण करावे. आपल्या मेहनतीचा पैसा चोरांच्या हाती लागू देऊन त्याचा दुरुपयोग होऊ द्यायचा नसेल, तर सतर्क राहणे आवश्यक आहे. आर्थिक सहाय्य करण्यापूर्वी आवश्यक ती खात्री केल्यास नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही.
सैन्य पोटावर चालते, असे म्हटले जाते, ते सत्यच आहे. देशाच्या तिन्ही सैन्य दलांचा पसारा मोठा आहे. तो सांभाळण्यासाठी प्रचंड प्रमाणावर आर्थिक तरतूदही करावी लागते. सगळी सोंगं करता येतात, पण पैशांचे सोंग करता येत नाही. त्यामुळे सैन्यासाठी पैसा उभा करण्यासाठी कुठे कुठे बचत केली जाऊ शकते ते पाहिले पाहिजे आणि त्याप्रमाणे कृतीही केली पाहिजे.
यंदाचे वर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वर्ष आहे. निवडणुकांच्या कालावधीत सभा, रोड शो, जाहिराती आदी माध्यमांतून प्रचार होत असतो. यासाठी पैसाही आवश्यक असतो. हाच पैसा सैनिकांसाठी उपलब्ध करून दिला पाहिजे. राजकीय पक्ष याचा गांभीर्याने विचार करतील का? जे राजकीय पक्ष हा विचार आणि कृती करतील ते नागरिकांच्या लक्षात राहतील. शत्रूचे कंबरडे मोडायचे असेल तर अशी तयारी करण्यासाठी तिन्ही सैन्य दलांना भक्कम अर्थसहाय्य मिळणे आवश्यक आहे. शत्रू हिंदुस्थानला कशाप्रकारे लक्ष्य करत आहे, त्याचे आपल्यावर किती बारीक लक्ष आहे हे पुलवामाच्या हल्ल्यातून लक्षात आले आहे. त्यामुळे राजकीय प्रचार-प्रसार करण्यासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा आपल्या संरक्षण दलांची शस्त्रसज्जता वाढवण्यासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. राजकीय पक्षांना हे अवघड मुळीच नाही. ठामपणे ठरवले तर या मार्गावरून जाता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे पोलीस यंत्रणेवर ताणही राहणार नाही आणि तो वेळ त्यांना नागरी समस्या सोडवण्यासाठी देता येईल.
प्रत्येकजण स्वतःच्या आर्थिक स्थितीप्रमाणे विविध कौटुंबिक कार्यक्रमांसाठी खर्च करत असतो. आपल्याकडे असा एक मोठा वर्ग आहे जो या कार्यक्रमांवर पाण्यासारखा पैसा खर्च करतो. हे कार्यक्रम एकदिवसीय असले तरी त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. यावरून खर्च करणार्या मंडळींची आर्थिक बाजू किती भक्कम असेल याचा अंदाज येतो. हा सर्व पैसा नववधू-वर यांच्याकडून सैनिकाच्या शस्त्र सज्जतेसाठी आणि कल्याणासाठी अर्पण झाल्यास ती देशासाठी एक मोठी भेट ठरेल.
अभिनेता सलमान खान याने त्याच्या ‘बीइंग ह्युमन’ या संस्थेच्या माध्यमातून पुलवामा दुर्घटनेच्या निमित्ताने केलेल्या सहाय्याविषयी केंद्रीय गृहराज्यमंत्री रीजीजू यांनी त्याचे आभार मानले. खरे म्हणजे सलमानचे आभार मानण्याची गरज काय आहे? सामान्य नागरिकदेखील त्याला जमेल तसे आर्थिक सहाय्य सैन्याला करीत आहेत. त्यामुळे कोणी वलयांकित व्यक्तीने सहाय्य केले म्हणून त्यासाठी ट्विट करण्याची आवश्यकता का भासावी? कठीण काळात करण्यात आलेले सहाय्य हे सहाय्यच असते. त्यामध्ये कोणी विशेष आणि कोणी कमी असा भेदभाव करण्याची गरज नाही.
पाकिस्तानला बेचिराख करण्यासाठी आमची सर्व संरक्षण दले सज्ज आहेत. पाकिस्तानवर सूड उगविण्यासाठी आमच्या सैनिकांचे हात कधीपासून शिवशिवत आहेत. अतिरेक्यांचा अड्डा बनलेल्या पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्यासाठी आपल्याला सुसज्ज असणे अनिवार्य आहे. मात्र चीन पाकिस्तानला शस्त्र सामुग्रीची रसद पुरवून आपल्याला नामोहरम करण्यासाठी अविरतपणे कार्यरत आहे. त्यामुळे समोर पाकिस्तान असला तरी त्याच्यामागे चीनची ताकद आहे. हे लक्षात घेतले पाहिजे आणि त्यानुसार आपली संरक्षण दले आधुनिकदृष्ट्या सुसज्ज केली पाहिजेत.
काटकसर कशी करावी, हे सामान्य नागरिकांकडून शिकण्यासारखे असते. ही मंडळी नेहमीच अंथरूण पाहूनच पाय पसरत असतात. त्यामुळे काटकसर काय असते, त्यासाठी आवड-निवडीला कशी मुरड घालायची हे त्यांना उत्तमप्रकारे ज्ञात असते. जे सामान्य नागरिकांना कळते ते देशातील इतरांना म्हणजेच आर्थिकदृष्ट्या भक्कम असलेल्यांनाही ज्ञात असले पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांची कृती असली पाहिजे. प्रत्येक देशात श्रीमंत-गरीब नागरिक असतात. आपण आपल्या देशाचा आणि देशावर वर्षानुवर्षे घोंघावत असणार्या जिहादी संकटाचा गांभीर्याने विचार करूया. देशावर संकट म्हणजे माझ्यावरचे संकट हा विचार मनात पक्का ठेवून या संकटाला एकजुटीने तोंड देऊ. तसेच शत्रूला धूळ चारण्यासाठी तिन्ही सैन्य दलांची आर्थिक बाजू भक्कम करूच, पण त्यांच्यासाठी वेळदेखील देऊ!





























































