सामना प्रतिनिधी। मुंबई
आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी युवासेनेने पुढाकार घेतला आहे. या विद्यार्थ्यांसाठी मुंबई महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱया 25 टक्के आरटीई प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज मुंबईतील विविध शिवसेना शाखांमधून भरण्यात येणार आहेत. उद्या 5 मार्चपासून 2019-20 या वर्षांच्या 25 टक्के आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.
गेल्या वर्षी मुंबई विभागात 25 टक्के प्रवेशाच्या 8 हजार 374 जागा होत्या. यापैकी केवळ 3 हजार 233 जागा भरण्यात आल्या. पालकांपर्यंत या प्रवेश प्रक्रियेविषयी माहितीच न पोहोचल्याने अनेक विद्यार्थी शाळा प्रवेशापासून वंचित राहत असल्याने युवासेना आणि भारतीय शालेय पालक संघाच्या वतीने उद्यापासून 25 टक्के प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज भरण्यास पालकांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे युवासेनेचे साईनाथ दुर्गे यांनी सांगितले.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या बैठकीत पालकांना मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही दुर्गे यांनी स्पष्ट केले. 22 मार्चपर्यंच ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.
25 टक्के शाळा प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे
निवासी दाखला, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, दिव्यांगांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र, विधवा महिला, घटस्फोटित प्रमाणपत्र.
बालकांसाठी वयोमर्यादा
नर्सरी – 3 वर्षे पूर्ण
ज्युनियर केजी – 4 वर्षे पूर्ण
पहिली – 5 वर्षे, 8 महिने पूर्ण


























































