
सामना प्रतिनिधी, वसई
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात हायअलर्ट जारी झाला असताना विरारजवळ 21 जिलेटीनच्या कांडय़ांसह स्फोटकांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. चांदीप येथे तानसा नदीच्या किनारी बेकायदा रेती उत्खनन करणाऱ्यांवर टाकलेल्या धाडीमध्ये ही स्फोटके सापडली. ही स्फोटके कुणी आणली, कशासाठी आणली, धरण उडवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता की, यापेक्षाही मोठा स्फोट घडवण्याचा डाव होता, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून पोलीस त्यादिशेने तपास करत आहेत. दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून शहरात दहशतीचे वातावरण आहे.
मांडवी पोलीस चौकीच्या हद्दीत चांदीपजवळ तानसा नदीकिनारी अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार टाकलेल्या धाडीत पोलिसांना तेथे जिलेटीन कांड्यांसह स्फोटकांचा मोठा साठा सापडला. पुलवामा हल्ल्यानंतर देशात पुन्हा एकदा दहशतवादी कारवाया होऊ शकतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी, रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर तानसा नदीकिनारी स्फोटकांचा साठा सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही स्फोटके मासेमारीसाठी किंवा रेती उत्खननासाठी अवैधरीत्या वापरली जात असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसे असेल तर ही बाब गंभीर असून दहशतवाद्यांनाही सहज स्फोटके उपलब्ध करून देण्याचे कारखाने येथे सुरू असल्याचे यावरून समोर आले आहे.
कामगारांकडूनच तस्करी
खदानमालकाकडे दगड फोडण्यासाठी काम करणाऱयांकडूनच डिटोनेटरची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्स कापून ते जिलेटीन कांडीमध्ये भरले जाते. त्यानंतर वात टाकून तिला पेटवले जाते. काही क्षणातच स्फोट होऊन मासे मारले जातात. जिवाचा धोका पत्करून गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात अशा पद्धतीने मासेमारी सुरू आहे.
मासेमारीसाठी स्फोटकांचा सर्रास वापर
मासेमारीसाठी जिलेटीन कांड्यांचा वापर सर्रास होत असल्याचे दोन दिवसांपूर्वीच उघडकीस आले होते. बोईसरजवळ नागझरी गावच्या हद्दीत सूर्या नदीपात्रात हातात स्फोटकांचा स्फोट होऊन गणेश वनगा (23) या तरुणाला जीव गमवावा लागला होता. अणुशक्ती केंद्राच्या अवघ्या 30 कि.मी. अंतरावर ही घटना घडली. दरम्यान काही महिन्यांपूर्वीच पोलिसांनी नागझरी गावामध्ये डिटोनेटर बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक केली होती. मात्र त्यानंतरही या परिसरात सहज स्फोटके मिळत आहेत.


























































