
सामना ऑनलाईन । बंगळुरू
कोणत्याही इच्छितस्थळी पोहचण्यासाठी गुगल मॅपची मदत घेतली जाते. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी पोहचणे सुलभ होते. मात्र, तांत्रिक त्रुटीमुळे या अॅपमुळे दिशाभूल झाल्याचा चांगलाच फटका बंगळुरूमधील एका कॅबचालकाला बसला. गुगल मॅपच्याआधारे त्याने प्रवाशाला चुकीच्या ठिकाणी पोहचवले. त्यामुळे प्रवाशाबरोबर त्याची वादावादी झाली. प्रकरण आणखी वाढले त्यानंतर त्याने कॅब उभी केलेल्या ठिकाणच्या जागामालकाने काही साथीदारांसह कॅबचालकाला बदडून काढले.
बंगळुरूतून दीपक कुमार (26) यांनी इलेक्टॉनिक्स सिटीतील कोणप्पा अगहरा येथे व्यवसायानिमित्त जाण्यासाठी कॅब बुक केली. कॅबचालकाला त्या जागेची माहिती नसल्याने त्याने तेथे पोहचण्यासाठी गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गावरून जाण्यास सुरुवात केली. मात्र, अगहरा येथे पोहचण्याऐवजी ते बाबू रेड्डी आणि रवी रेड्डी यांच्या व्यावसायिक ठिकाणी पोहचले. अयोग्य ठिकाणी पोहचवल्यावरून दीपक यांची कॅबचालाकाशी वादावादी झाली. मात्र, गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गानेच आणल्याचे कॅबचालकाने सांगितले. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. आपल्या व्यावसायिक ठिकाणी कोणती गाडी उभी आहे, हे पाहण्यासाठी बाबू आणि रवी रेड्डी तेथे आले. त्यांनी कॅबचालकाला आमच्या जागेत गाडी का उभी केली अशी विचारणा केली. त्यावरून कॅबचालकाचा रेड्डी बंधूंशी वाद झाला. रेड्डी यांनी साथीदारांना बोलवून कॅबलाचकाला बदडून काढले.
कॅबचालकाने इलेक्टॉनिक्स सिटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर रेड्डी बंधू आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. गुगल मॅप भरकटल्याने कॅब चालकाला अडचणींना सामना करावा लागला.























































