आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। परभणी

परभणी लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण तयारी करण्यात आली असून आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार असून यासाठी 11 आचारसंहिता पथके तयार करण्यात आली आहेत. या निवडणुकीत परभणीत लोकसभेसाठी 19 लाख 70 हजार 954 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. येत्या 19 ते 26 मार्चदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 27 मार्च रोजी छाणणी, 29 मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेणे आणि 18 एप्रिलला मतदान प्रक्रिया होणार आहे. 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी संपूर्ण प्रक्रीयेवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध कक्षप्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असल्याची माहिती मुख्य निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेत निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी (निवडणुक विभाग)महादेव किरवले यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, निवडणूक आयोगाने देशभारात आचारसंहिता लागू केल्याची घोषणा केली असून परभणीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करत या कार्यकाळात सर्व शासकीय वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली आहेत. अनेक राजकीय पोस्टर्स काढून टाकण्यात येणार आहेत. तसेच उद्घाटन फलकावर स्टिकर्स किंवा अन्य प्रकारे झाकून टाकण्यात येणार आहेत. दोन ठिकाणी मतदार यादीत नावे असलेले मतदार एका ठिकाणाहून वगळण्यात आले आहेत. निवडणुक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानूसार सर्व प्रक्रीया पार पाडण्यात येणार आहेत.

जिंतूर विधानसभा मतदार संघात 3,45,127, परभणी 2,99,187, गंगाखेड 3,83,864, पाथरी 3,47,451, परतूर 2,90,036, घनसावंगी 305289 असे एकूण 19,70,954 मतदान आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. परभणी जिल्ह्यातील जिल्हास्तरीय निवडणुकीशी संबंधीत विविध कक्षप्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तसेच 22 भरारी पथके, 15 व्हिडीओ सनिरीक्षण पथक, 18 स्थिर सनियंत्रण पथक, 4 व्हिडिओ चित्रीकरण तपासणी, 11 आचारसंहिता पथक, 4 खर्च पथक व सहाय्यक खच निरीक्षक अशी पथके तैनात करण्यात येणार आहेत. 1504 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी आवश्यक कर्मचारी 6 हजार 16 तैनात करण्यात येणार असून 25 टक्के राखीव कर्मचाऱ्यांसह 7 हजार 520 कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्ह्यातील 54 अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेतली जाणार आहे. तसेच उपद्रव देणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात येणार आहे. मतदारांना १९५० या टोल क्रमांकावर मतदानाशी निगडीत सर्व माहिती मिळणार आहे.

ईव्हीएम वर मतदारांचा फोटो असणार असून सर्व मतदान केद्रांवर व्हिव्हीपॅट मशीन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. रात्री 10 वाजेनंतर प्रचार करता येणार नाही, रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊडस्पिकरचा वापर करता येणार नाही. काय करावे? आणि काय करू नये? यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या आचारसंहितेचे काटेकोटरपणे पालन करावे, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी दिले.