
सामना प्रतिनिधी । पाथर्डी
झाडावरून पडून मृत पावलेल्या एका वृद्ध माकडाची अंत्ययात्रा काढून पागोरी पिंपळगाव ग्रामस्थांनी शोकाकुल वातावरणात निरोप देण्यात आला. अंत्यविधी सोहळा संपेपर्यंत गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
पागोरी पिंपळगाव गावातील पिंपळाच्या झाडाजवळ एक माकड अनेक दिवसांपासून राहत होते. आज दुपारी ते झाडावरून खाली पडले आणि मृत पावले. मृत झालेल्या माकडाचे काय करायचे, यासाठी सरपंच आजिनाथ दराडे, अंबादास लाड, अशोक दराडे, पिनू लाड, विठ्ठल दराडे, दिनकर दराडे, साईनाथ अनपट हे येळी संस्थानचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्याकडे गेले. तेव्हा र्धािमक विधी करून व अंत्ययात्रा काढून माकडाचा अंत्यसंस्कार करा, असे महाराजांनी सांगितले. त्यानंतर सर्व ग्रामस्थ एकत्र आले व त्यांनी माकडाचा मृतदेह भगव्या रंगाच्या शालीत गुंडाळून ठेवला व त्यानंतर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत व भजन म्हणत गावातून अंत्ययात्रा काढली. त्यानंतर हनुमानाच्या मंदिरासमोर खड्डा खोदून त्यात माकडाला धार्मिक विधी करून पुरण्यात आले.






























































