मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनाच मतदानाची तारीख ठाऊक नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

निवडणुका सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी असलेली यंत्रणाच झोपेत आहे की काय, असा प्रकार घडला आहे. मुंबईच्या जिल्हाधिकाऱयांनाच मतदानाची तारीख ठाऊक नाही. निवडणूक कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलेल्या पत्रात मतदानाची तारीख 29 एप्रिलऐवजी 20 एप्रिल अशी दाखवली गेली आहे. त्यामुळे तारीख बदलली की काय, असा संभ्रम कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

निवडणुकीच्या कामासाठी नेमण्यात येणाऱया कर्मचाऱयांना व शिक्षकांना मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातून गेल्या 15 मार्च रोजी तातडीची पत्रे पाठवली गेली. त्यात त्यांना 26 मार्चला प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आले आहे. तसेच मतदानासाठी कोणत्या केंद्रावर नियुक्ती केली गेली आहे त्याची माहिती देण्यात आली. पण हे प्रशिक्षण आणि नियुक्ती कोणत्या मतदानासाठी आहे याबद्दल कर्मचारी संभ्रमात पडले आहेत. कारण पत्रात मतदानाची तारीख 20 एप्रिल अशी दाखवली गेली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदानाच्या टप्प्यानुसार मुंबईत 29 एप्रिल रोजी निवडणूक आहे.

कारवाई होणार का?
देशाच्या निवडणूक आयुक्तांच्या निर्देशानुसार निवडणूक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्या असून कोणत्याही परिस्थितीत त्यात बदल केला जाऊ शकत नाही. अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे या पत्रात नमूद आहे. मग मतदानाची तारीख चुकवणाऱ्यांवर कारवाई करणार की नाही, असा सवालही कर्मचाऱ्यांनी केला आहे.