सुजय विखे विरुध्द संग्राम जगताप असा ‘रंगणार’ सामना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
पवारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या नगर दक्षिण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप आणि भाजपचे डॉ. सुजय विखे यांच्यात लढत होणार आहे.

सामना प्रतिनिधी । नगर

काँग्रेस आघाडीमध्ये लोकसभेकरीता उमेदवारी द्यायची कोणाला असा पेच राष्ट्रवादीत निर्माण झाल्यानंतर अनेक दिग्गजांची नांवे असताना अखेरीला विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये इच्छूकांना संधी न दिल्याने उलट सुलट चर्च चांगलीच रंगली आहे. त्यातच भाजपाकडून सुजय विखे यांच्या नावाची अद्याप घोषणा झाली नसली तरी ही लढत विखे विरुध्द जगताप अशीच मानली जात आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये अनेकजण आपले राजकीय नशिब अजमावणार असले तरी या मतदार संघामध्ये कुणालाही या दोघापेक्षा जास्त यश गाठता येणार नाही, हेही तितकेच खरे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून नगर दक्षिणच्या जागेवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले होते, मात्र होळीच्या दिवशी सदरचे वातावरण निवळले असून आमदार संग्राम जगताप यांची उमेदवारी पक्षश्रेष्ठींकडून निश्चित करण्यात आली आहे. जगताप यांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीने शिक्कामोर्तब केला आणि इकडे त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजकीय रंगपंचमीच साजरी केली तसेच फटाक्यांचीही मोठ्या प्रमाणात आतषबाजी केल्याने नेमके काय झाले? हे नगरकरांना समजेनासे झाले. निवडणुक अद्याप लांब असताना जोरदार आतषबाजी झाल्याने नगरकरांमधील उत्सुकता शिगेला पोहचली.

या निवडणुकीत विकासाच्या मुद्यापेक्षा उत्तर – दक्षिण आणि पक्षबदलाचा वाद रंगणार आहे. वास्तविक पाहता नगर दक्षिणची जागा काँग्रेसला न सोडल्याने विखे यांनी भाजपात प्रवेश करुन त्यांनी आपली उमेदवारी निश्चित केली असली तरी आता गांधी गट काय निर्णय घेणार अन् गांधी गट कुणाला छुपा पाठींबा देणार याचीही चर्चा रंगू लागली आहे.

राजकीय घडामोडीत आता दोन्ही नेत्यांचा चांगलाच कस लागणार असून उघड कोण आणि छुपे कोण हे लवकरच समोर येणार आहे. मध्यंतरीच्या राजकीय खेळीत विखेंच्या मेळाव्यांना ज्या आमदारांनी तथा पदाधिकार्‍यांनी हजेरी लावली. त्यावेळी ज्यांनी आघाडीची उमेदवारी सुजय विखे यांना निश्चित समजून शब्द दिले होते ते आता विखेंना मदत करणार की जगतापांना हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे. जगतापांच्या उमेदवारीमुळे राजकीय वातावरण कमालीचे तयार झाले असून पुढे काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.