
सामना ऑनलाईन, मुंबई
संकटात सापडलेल्या ‘जेट एअरवेज’च्या सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. जेटचे संस्थापक, चेअरमन नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता यांनी सोमवारी संचालक मंडळातून अखेर राजीनामा दिला आणि ‘जेट’ला वाचवले आहे. या राजीनाम्यानंतर कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेल्या जेटला मदत करण्यासाठी बँका सरसावल्या आहेत. कंपनीच्या कर्जदारांना आता 15 हजार कोटी रुपयांचा निधी तातडीने मिळणार आहे.
नरेश गोयल यांनी ‘जेट एअरवेज’साठी कोणताही त्याग करण्याची तयारी असल्याचे पत्र लिहिले आहे. विनय दुबे यांच्यावर आता सीईओ पदाची जबाबदारी देण्यात आली असून संचालक केव्हीन नाईट यांनीही संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. गोयल हे जेटचे गेली 25 वर्षे संस्थापक, चेअरमन होते.
मे अखेरपर्यंत जेट विकणार
‘जेट एअरवेज’ मे महिन्यात विकण्यात येईल. त्यासाठी खरेदीदाराची प्रतीक्षा आम्ही करीत आहोत, असे स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन रजनीश कुमार यांनी सांगितले. त्या एअरवेजचे 51 टक्के शेअर्स बँक घेणार आहे. या ताज्या घडामोडींमुळे नरेश गोयल यांचे शेअर्स 50 टक्क्यांवरून 25 टक्क्यांवर आले आहेत, तर अबुधाबीच्या इतिहाद एअरवेजचे शेअर्स 24 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर आले.
आपातकालीन निधी मिळण्याची शक्यता
‘जेट एअरवेज’वर सध्या 28 बँकांचे 8 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाकडून जेटला निधी मिळू शकतो. सुरुवातीला निधी देण्यास बँकांचा विरोध होता. परंतु आता मावळला आहे.
कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी अंतरिम मॅनेजमेंट कमिटी स्थापन करण्यात येईल. जेटचे कर्जदाता मंडळात दोन सदस्य प्रतिनिधी म्हणून पाठवतील. कंपनीच्या कर्जाला शेअर्समध्ये बदलणे आणि 1500 कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्याबाबत स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली एक आराखडा तयार हेत आहे. गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर कंपनीचे शेअर्स 15 टक्क्यांनी वधारले.






























































