आर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगेश सौंदाळकर, मुंबई

जे कैदी कधी शाळेतच गेले नव्हते असे कैदी आता फाड फाड मराठी आणि इंग्रजी बोलू आणि लिहू लागले आहेत. चक्क 10 कैदी हे उलटी एबीसीडी लिहीत आहेत. आर्थर रोड तुरुंगातील प्रौढ साक्षरता अभियानामुळे आतापर्यंत 100 कैदी साक्षर झाले आहेत तर आतापर्यंत 105 कैद्यांनी बी.ए., बी.कॉम., एम. ए.करिता मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आहे.

तुरुंग प्रशासनाच्या अंतर्गत येणारे मुंबई मध्यवर्ती (आर्थर रोड) कारागृह महत्त्वाचे मानले जाते. कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता तुरुंग प्रशासन विविध उपक्रम हाती घेत असते. खासकरून निरक्षर असलेल्या कैद्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. याची दाखल घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक (दक्षिण विभाग) राजवर्धन यांच्या संकल्पनेतून आणि अधीक्षक हर्षद अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली तुरुंगात प्रौढ साक्षरता अभियान सुरू केले. जे साक्षर कैदी आहेत त्यांना एक निरक्षर कैदी शिकवण्याची जबाबदारी देण्यात आली.

सध्या 300-350 कैदी हे निरक्षर आहेत. तुरुंगातील बरॅकमध्ये साक्षरता वर्ग सुरू आहेत. दिवसातून दोन वेळेस त्यांना मराठी आणि इंग्रजी लिहायला शिकवले जाते. साक्षरता अभियानामुळे कैदी फाड फाड इंग्रजी बोलत आहेत, तर 10 असे कैदी आहेत जे कधीच शाळेत गेले नव्हते ते आता उलटी एबीसीडी लिहीत आहेत. सुरुवातीला त्यांना लिहिण्याकरिता अडचणी येत होत्या. उलटी एबीसीडी लिहिणारे कैदी हे आर्थर रोड तुरुंगात चर्चेचा विषय ठरत आहेत. तुरुंगात काही शिक्षित कैदी आहेत. त्यांना तुरुंगात असल्यामुळे शिक्षण पूर्ण करता येत नव्हते. अशा 105 कैद्यांना इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून प्रवेश देण्यात आला आहे. बी.ए., बी.कॉम., एम.ए .मध्ये त्यांनी प्रवेश घेतला आहे. येत्या जून महिन्यात त्यांची परीक्षा आहे. परीक्षेकरिता ते कसून अभ्यास करत असल्याचे चित्र आहे.

प्रौढ साक्षरता अभियानाचा तक्ता
वय                  संख्या
18 -30            210
30-40              50
40 पेक्षा जास्त      60

ह्युमन राइटस् कोर्सला अधिक प्रतिसाद
तुरुंगात कैद्यांकरिता सहा महिने कालावधी असलेले विविध कोर्सेस चालवले जातात. सध्या ह्युमन राइटस् कोर्सला अधिक प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे पुस्तक बाइंडिंगच्या कोर्सेसला हळुवार प्रतिसाद मिळत आहे. तसेच परदेशी भाषा शिकवणीचे क्लासेस घेतले जातात. फ्रेंच भाषा शिकण्याकरिता आतापर्यंत सहा कैद्यांनी अर्ज दिल्याची नोंद आहे.

डिजिटल क्लासरूमचा विचार
बरॅकमध्ये शिकणाऱ्या कैद्यांकरिता डिजिटल क्लासरूम तयार करण्याचा तुरुंग प्रशासन विचार करत आहे. डिजिटल क्लास रूममुळे कैदी आकर्षित होऊन ते साक्षरता मोहिमेत सहभागी होतील. या क्लासरूमकरिता जागा शोधून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

तुरुंगातील साक्षरता अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बंदीकरिता लायब्ररीमध्ये पुस्तके ठेवली जातात. साक्षरता मोहिमेमुळे निरक्षर बंदी साक्षर होऊ लागले आहेत.
-अंकुश भिंगळे, शिक्षक आर्थर रोड तुरुंग

कारागृहात आलो तेव्हा अशिक्षित होतो, पण साक्षरता अभियानामुळे लिहिता-वाचता येते. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला पदवीधर व्हायचे आहे. बी. ए.च्या प्रवेश परीक्षेची तयारी करत आहे. तुरुंगातून सुटल्यावर पुढील शिक्षण पूर्ण करणार आहे.
– शहावेज मणेर, बरॅक क्रमांक 3