
सामना प्रतिनिधी, मुंबई
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ऑर्केस्ट्रा, कलापथक, तमाशा कलावंतांना कार्यक्रम सादर करण्यासाठी तालुका पोलीस आणि तहसीलदार कार्यालयातून परवानगी नाकारण्यात येत होती. त्यामुळे कलावंतांमध्ये मोठी नाराजी होती. याची दखल घेत निवडणूक आयोगाने आज लोककला पथकांना कार्यक्रम करण्यास परवानगी देण्याबाबत पत्रक काढून कलावंतांना काहीसा दिलासा दिला आहे. त्यामुळे कलापथकांचा खेळ खल्लास होणार नसून तो सुरूच राहणार आहे.
आचारसंहिता लागू झाल्याने लोककलावंतांना कार्यक्रम सादर करण्यासाठी परवानगी मिळत नसल्याने त्यांचे नुकसान होणार आहे. एप्रिल महिन्यापासून जत्रा सुरू होणार आहेत. गुढीपाडवा ते बौद्ध पौर्णिमादरम्यान गावागावांत जत्रा-उत्सव होत असतात. या जत्रा-उत्सवासाठी लोककलावंत आपली कला सादर करतात. वर्षभराची कमाई त्यांची या जत्रा-उत्सवातून होते. परंतु या वर्षी लोकसभा निवडणुका असल्याने आचारसंहिता लोककलावंतांच्या ऐन हंगामात लागू झाल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले.
त्यानंतर आज कलावंतांच्या उदरनिर्वाहाचा विचार करून मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी पत्रक काढून आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.
लोककलावंतांच्या रोजीरोटीवर गंडांतर
महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते संपेपर्यंत आचारसंहितेचे कारण सांगून तालुका पोलीस ठाणे तसेच तहसीलदार कार्यालयाकडून तमाशा या लोककलेच्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात येत आहे. राज्यात 465 तमाशा फड असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होत आहे. आचारसंहितेमुळे लोककलावंतांच्या रोजीरोटीवर गडांतर येऊ नये त्यासाठी निवडणूक आयोगाने तमाशा कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी महर्षी शीघ्रकवी पठ्ठेबापूराव लोककलावांतांच्या मराठी परिषदेने केली होती. तसे पत्र निवडणूक अधिकाऱ्यांना दिले होते.
























































