
सामना ऑनलाईन । मुंबई
सोमवारी चाळिशीपार गेलेला पारा मंगळवारी 39.5 डिग्री सेल्सियसपर्यंत उतरला. तरीही सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांना उन्हाचे चटके बसले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून येणाऱ्या उष्ण वाऱयांमुळे मुंबईत कडक ऊन आहे. हे वारे कोरडे असल्यामुळे एखाद्या भट्टीच्या झळा बसाव्यात तशी परिस्थिती मुंबईत अजूनही आहे. येत्या 48 तासांत पारा आणखी खाली उतरेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
अरबी समुद्रात एक सिस्टीम तयार होत असून तेथून वाहणाऱ्या वाऱयांमुळे पारा खाली उतरला आहे. दोनच दिवसांत तापमान आणखी घसरेल आणि मुंबईकरांना दिलासा मिळेल असा अंदाज आहे. राज्यालाही उन्हाचा चांगलाच तडाखा बसला असून अनेक ठिकाणी पारा 40 डिग्री ते 41 डिग्री सेल्सियस इतका आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. तसेच तापमानात काही प्रमाणात वाढ झाली.
























































