
सामना ऑनलाईन । मुंबई
गेल्या दोन दिवसांपासून एखाद्या भट्टीच्या बाजूला उभे राहिल्यासारखा अनुभव घेत असलेल्या मुंबईकरांना बुधवारी थोडासा दिलासा मिळाला. अरबी समुद्रावरून उत्तर-पश्चिमेकडून वाहाणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईचा पारा तब्बल 6 डिग्री सेल्सियसने घसरला, पण आर्द्रता वाढल्याने अंगातून घामाच्या धारा सुरू झाल्या.
उन्हाचे चटके कमी झाल्यामुळे मुंबईकरांना हायसे वाटले. अनेकांनी सकाळी मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी बाहेरचा रस्ताही धरला, पण उकाडय़ाने त्यांना हैराण केले. कारण कोरडे वारे वाहत नसले तरीही समुद्रावरून वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांमुळे अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. आणखी चार दिवस मुंबईसह कोकणात अशीच परिस्थिती राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
गुजरात, राजस्थानमधून उष्ण कोरडे वारे मुंबईत येऊन धडकल्याने मुंबईचा पारा चाळिशीपार गेला होता. त्यानंतर आज अरबी समुद्रावरून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पारा घसरला. पुढचे चार दिवस मुंबईचा पारा घसरलेलाच असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांतही तापमानात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागातही तापमान सरासरीच्या जवळपास होते.
कोल्हापुरात पुन्हा वादळी पावसाचा इशारा
कोल्हापूरमध्ये येत्या 24 तासांत वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सोमवारीही कोल्हापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता.
- कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.
शहर तापमान
- महाबळेश्वर 35
- कोल्हापूर 37
- पुणे 39
- गोंदिया 36
- सातारा 38
- नाशिक 38
- सांगली 38



























































