
सामना ऑनलाईन । गडचिरोली
दारूच्या आमिषापोटी मतदारांनी मतदान करू नये यासाठी गडचिरोली जिह्यात जनजागृतीपर होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. ‘जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’ असा सज्जड दम देणारे होर्डिंग्ज सध्या गडचिरोलीत जिकडे तिकडे पाहायला मिळत आहे.
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या ‘मुक्तिपथ’ आणि ‘सर्च’ संस्थेच्या वतीने ही अनोखी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ‘चला, मतदान करू’ असा संदेशही घरोघरी पोहोचवण्यात येत आहे. निवडणुकीत दारूचा वापर होऊ नये यासाठी होर्डिंग्जच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याचे डॉ. अभय बंग यांनी म्हटले आहे.

























































