विरोधकांकडे बघून ‘अब तक 56’ आठवला! उद्धव ठाकरेंचे खणखणीत भाषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गांधीनगर

भाजप अध्यक्ष अमित शहा आज गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी गांधीनगरमध्ये झालेल्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ डागत तुमचा नेता कोण असा सवाल केला. विचार मिळोत न मिळोत, ध्येय एक असो किंवा नसो, मात्र विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. त्यांना कोणतीही विचारधारा, दिशा नाही आणि नेता नाही अशी टीका त्यांनी केली. विरोधकांमध्ये किती 56 जण आहेत, त्यांना बघून अब तक 56 चित्रपटाची आठवण झाली असं उद्धव ठाकरे म्हणाले. या विरोधकांनी हात मिळवले आहे. ‘दिल मिले ना मिले हात जरूर मिलना चाहीये’ तसं या विरोधकांचे सुरू असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

शिवप्रभूंच्या महाराष्ट्रातून आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे आशीर्वाद घेऊन अमित शहा यांना शुभेच्छा देण्यासाठी गांधीनगरमध्ये आल्याचे ते म्हणाले. आपण अमित शहा यांच्या सभेसाठी आल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. आपण इथे आल्याने काही जणांना आनंद झाला आहे. तर काही जणांना स्वभावानुसार पोटात दुखायला लागले आहे. अशा पोटदुखी झालेल्यांसाठी आमच्याकडे आणि अमित शहा यांच्याकडे इलाज आहे. सर्वात जालीम औषध तर तुमच्याकडे आहे, असे त्यांनी जनतेला सांगितले. काही काळापासून दोन समान विचारधारा असलेल्या पक्षांमध्ये दुरावा निर्माण झाल्याने काही लोकांना आनंद झाला होता. आमच्यात मतभेद आणि मतभिन्नता निर्माण झाली होती. मात्र, अमित शहा यांनी आपली निवासस्थानी येऊन भेट घेतली. आम्ही चर्चा केली आणि आमच्यातील मतभेद, मतभिन्नता दूर झाली आहे. आता आमच्यात कोणताही वाद नाही. शिवसेना असो किंवा भाजप आमची विचारधारा एकच आहे. हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व ही आमची विचारधारा आहे. शिवसेनाप्रमुख नेहमी सांगायचे हिंदुत्व हा आपला श्वास आहे. श्वास थांबला तर आपण कसे जगणार, हाच विचार करून आम्ही एकत्र आलो आहोत.

आमच्या विरोधात 56 पक्ष एकत्र आले आहे. त्यांनी हातमिळवणी केली आहे. हात मिळवले पण त्यांचे विचार जुळले काय, असा सवालही त्यांनी केला. शिवसेना भाजप युतीचे विचार, मन आणि हृदय जुळले आहे. गेल्या पाच वर्षात झाले ते झाले. मात्र, त्याआधीही 25 वर्षे आम्ही एकत्र होतो. त्यावेळी राष्ट्रीय राजकारणात आमच्यासोबत प्रकाशसिंग बादल यांच्याशिवाय कोणीही नव्हते. हातात भगवा घेऊन आम्ही वाटचाल करत होतो. 25 वर्षापासूनचे आमचे स्वप्न प्रत्यक्षात आले. दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकला. आमचे विचार, मन, ध्येय आणि नेता एक आहे. विरोधी पक्षांमध्ये साम्य असलेली एकतरी गोष्ट आहे काय असा सवालही त्यांनी केला. तुमचा नेता कोण आहे, पंतप्रधान कोण बनणार याचे उत्तर विरोधकांनी द्यावे असे आव्हानही त्यांनी केले. आम्हाला सत्ता हवी आहे. मात्र, आम्हाला सत्तेची लालसा नाही. विरोधी पक्षांनी एकत्र रॅली करावी आणि एकच नारा द्यावा. प्रत्येकाचा नारा, नेता आणि विचारधारा वेगळी आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच नारा देऊन दाखवावा असे आव्हानही त्यांनी विरोधी पक्षांना केले. विचारधारा नाही, ध्येय नाही आणि नेता नाही अशी विरोधी पक्षांची स्थिती आहे. प्रत्येकजण पंतप्रधान बनण्यासाठी उतावळा आहे. त्यामुळे आतापासूनच ते एकमेकांचे पाय खेचत आहेत. त्यामुळे ते पुढची वाटचाल कशी करणार अशी सवाल त्यांनी केला.

आम्ही कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही, ती आमची संस्कृती नाही. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद घेऊन अमित शहा यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत. निवडणुका आल्यावर वातावरण तापते. मात्र आता वातारण तापवण्यासाठी विरोधीपक्ष आहेतच कुठे, सगळीकडे फक्त भगवा रंग आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. आम्ही दिलेल्या आश्वासनांप्रमाणे देशाचा विकास करणार आहोत. विकासासाठी आम्ही भाजपसोबत असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.