
अतुल कांबळे, मुंबई
मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे घसे तयार सरबतांअभावी कोरडे झाले असताना प्लॅस्टिकबंदीची कुऱहाड ‘आरओ’चे शुद्ध पाणी पुरविणाऱया वॉटर वेंडिंग मशीनवरही पडली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे वॉटर बॉटल असतात त्यांनाच पाणी विकत मिळत असून कामगारांच्या पगारवाढीच्या मागणीमुळे बहुतेक मशीन बंद पडल्या आहेत.
रेल्वेची उप कंपनी असलेल्या आयआरसीटीसीने प्रवाशांच्या सोयीसाठी विविध स्थानकांवर ‘वॉटर वेंडिंग’ मशीन बसविल्या आहेत. या मशीन खरे तर स्वयंचलित तंत्रज्ञानावर आधारित पाणी विक्री करण्यासाठी सक्षम आहेत. परदेशात ज्याप्रमाणे वृत्तपत्र विकत घेताना नागरिक प्रामाणिक पैसे पेटीत टाकून योग्य वृत्तपत्र घेतात त्या धर्तीवर ही योजना आखली जाणार होती, परंतु आपल्या येथे त्यास कितपत यश मिळेल या भीतीतून प्रत्येक वॉटर वेंडिंग स्टॉलवर चालक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विविध रेल्वे स्थानकांवर ‘जनजल’ आणि फॉन्टस’ नावाने वॉटर वेंडिंग मशीन बसविण्यात आल्या असून त्यासाठी कंत्राटदार नियुक्त करण्यात आले आहेत. पैसे टाकून पाणी देणारी वॉटर वेंडिंग मशीन एखाद्या बँक एटीएमप्रमाणे काम करते. परंतु काही जण या मशीनमध्ये नाण्याऐवजी इतर वस्तू टाकायचे. त्यामुळे मशीन बिघडू लागल्या. कंत्राटे वाटताना रेल्वेची केवळ जागा मिळणार. इतर बाबी कंत्राटदारांवर सोपविण्यात आल्या. त्यानंतर ‘आरओ’चे शुद्ध पाणी एक-दोन रुपयांत देण्याची योजना धडाक्यात सुरू झाली. पाण्याच्या प्लॅस्टिक जार किंवा थर्माकोलच्या ग्लाससाठी एक रुपया अतिरिक्त आकारण्यात येत होता. परंतु प्लॅस्टिकबंदीनंतर या प्लॅस्टिक जारविषयी मीडियात बातम्या आल्याने थर्माकोलच्या चहाची ग्लासे तातडीने हटविण्यात आली. त्यानंतर प्लॅस्टिक जारही अदृश्य झाले. शेवटी आता ज्याच्याकडे पाण्याची बाटली त्यालाच विकतचे पाणी अशी वेळ आल्याचे चित्र विविध रेल्वे स्थानकांवर दिसत आहे.
मध्य रेल्वेचे वॉटर वेंडिंग मशीन
स्थानके एकूण मशीन
55 81
स्थानके ‘जनजल’
28 41
स्थानके ‘फॉन्टस’
27 40
आयआरसीटीसी नामानिराळी
वॉटर वेंडिंग मशीनवरील स्टाफ पगारासाठी वारंवार आंदोलन करीत असून तो संबंधित कंत्राटदाराकडे न जाता मध्य रेल्वेच्या हेडक्वॉटर, डीआरएम कार्यालयांना घेराव घालत असल्याने रेल्वे अधिकारी चक्रावले आहेत. ही योजना ‘आयआरसीटीसी’ची असल्याने ते मात्र नामानिराळे राहिले आहेत.




























































