
सामना प्रतिनिधी । वसई
काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून त्यांच्या पोटातलं आता ओठांवर आलं आहे. काँग्रेस नेमकी कोणासाठी काम करू इच्छिते? देशवासीयांसाठी की देशद्रोह्यांसाठी, असा सवाल करतानाच सांगा, देशद्रोह्यांना मांडीवर घेणारे सरकार हवे की त्यांना फासावर लटकवणारे, असा जबरदस्त घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. जो पक्ष देशद्रोहाचा गुन्हा काढून टाका असे म्हणतो त्या पक्षाचा निवडणूक लढवण्याचा अधिकार रद्द करा, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांचा मंगळवारी पालघर जिह्यात झंझावाती दौरा झाला. दुपारी साडेअकरा वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत असे दहा तास प्रचाराचे तुफान वसई ते डहाणू घोंगावत होते. वसईतील बापाणे नाक्यावरून सुरू झालेल्या या प्रचार यात्रेमुळे अवघा पालघर जिल्हा भगवामय झाला होता. या तुफानी संवाद-संपर्क यात्रेत उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात अनेक वादग्रस्त मुद्द्यांचा समावेश आहे. कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 कलम रद्द करणार नाही, फुटीरतावाद्यांशी चर्चा होईल आणि देशद्रोहाचे कलम रद्द करण्यात येईल, या काँग्रेसच्या जाहीरनाम्याची उद्धव ठाकरे यांची चिरफाड केली. ते म्हणाले, काँग्रेस कोणासाठी काम करू इच्छिते ते आता जाहीर झाले. मी काँग्रेसचा जाहीरनामा वाचलेला नाही. काँग्रेसचा जाहीरनामा वाचण्यासारखा असेल असं मला कधीच वाटलं नाही. पण बरं झालं, काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यांना देशाची काहीही पडलेली नाही. काँग्रेसने नवीन जाहीरनामा जाहीर करण्याआधी पाच वर्षे, त्याही आधी पाच वर्षे संपूर्ण देशात जेव्हा त्यांचं सरकार होतं तेव्हा दिलेले जाहीरनामे काढून वाचावेत, असे फटकारेही उद्धव ठाकरे यांनी लगावले.
राहुलच्या आजीच्या गरिबी हटाव घोषणेचं काय झालं?
राहुल गांधी देशातील जनतेला 72 हजार रुपये देण्याच्या घोषणेचाही उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, मध्यंतरी गरीबांबद्दल काहीतरी बोलले… 72 हजार रुपये देण्याची घोषणा केली. मी त्याला एक आठवण करून देतो. त्यांच्या आजीनेही एक वचन दिलं होतं, गरिबी हटाव… किती वर्षे झाली त्याला? का नाही हटली गरिबी?
काँग्रेस-राष्ट्रवादीला बुडवा
विरोधकांनी आमच्यात पुन्हा मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला. दोन हिंदुत्ववादी पक्ष भांडत होते. विरोधक त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत होते. शिवसेना-भाजप युतीचं भांडण व्हावं, त्यांचं फाटावं म्हणून हे काँग्रेस-राष्ट्रवादीवाले देव पाण्यात बुडवून बसले होते. आता या निवडणुकीत त्यांना बुडवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. आमची युती भक्कम आहे. हिंदुत्वाची युती आहे. त्यामुळे केवळ पालघर किंवा राज्यातच नव्हे तर चालू संसदेवर पुन्हा एकदा भगवा फडकणारच, असा जबरदस्त विश्वास त्यांनी व्यक्त केला.






























































