
सामना ऑनलाई । नागपूर
काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे देशाच्या अस्तित्वासाठी घातक आणि संविधानविरोधी असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. देशद्रोह कलम रद्द करणे हे अत्यंत घातक असून संविधानामध्ये दिल्याप्रमाणे देशाच्या विरोधात जर कुणी कारवाया करत असेल तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लावला जातो, पण काँग्रेस हे कलमच रद्द करण्याचे आश्वासन देत आहे. ही गोष्ट देशाच्या अस्तित्वासाठीच घातक असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
वणी येथे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. काँग्रेसच्या गरिबी हटवण्याच्या घोषणेबद्दल ते म्हणाले, राहुल गांधींच्या पणजोबांपासून आजी, वडील आणि आईनेही गरिबी हटवण्याचा नारा दिला, पण काँग्रेसच्या कार्यकाळात गरिबी काही हटली नाही.
























































