
सामना ऑनलाईन । मुंबई
ऐन मार्च-एप्रिलमध्ये सूर्यदेवाच्या प्रकोपाने मुंबईचे तापमान थेट नागपूरसारखे वाढल्याने मुंबईतील लोकसभा उमेदवारांचे प्रचाराचे वेळापत्रक आणि फंडाही बदलला आहे. मोठमोठय़ा सभांपेक्षा पहाटे आणि सकाळी उद्याने आणि मैदानातील मॉर्निंग वॉकने मैदानात चालणाऱ्या आणि रपेट करणाऱ्या नागरिकांशी मोकळी चर्चा व संध्याकाळच्या थंडाव्यात आपल्या मतदारसंघांतील सोसायटय़ा, नागरी वस्त्या, मंदिरे, समाजमंदिरे आणि सार्वजनिक स्थळांना भेटी देऊन मतदारांच्या भावनांना हात घालण्याचा आगळा फंडा सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी अमलात आणल्याचे दिसत आहे.
शिवसेना-भाजप-रिपाइं महायुती आणि काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी मुंबईतील लोकसभा मतदारसंघांतील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे, पण सूर्यदेवाचा वाढता प्रकोप पाहता मुंबईतील सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी वातावरणाला अनुकूल असा प्रचार करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे छोटय़ा हॉलमध्ये, सोसायटय़ांत नागरिकांच्या भेटीगाठी, मॉर्निंग वॉक करीत ज्येष्ठ नागरिकांशी संवाद, समाजमंदिरात जाऊन विविध समाजाच्या नागरिकांशी चर्चा असे फंडे उमेदवारांनी अवलंबिले आहेत. बहुसंख्य उमेदवारांनी सायंकाळी पाच वाजल्यापासून आपल्या प्रचाररथांवरून फिरण्यास सुरुवात केली आहे. गजानन कीर्तिकर, गोपाळ शेट्टी, पूनम महाजन या विद्यमान खासदारांसह मनोज कोटक, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, संजय निरुपम, संजय पाटील आदी नेत्यांनी समूहांच्या बैठका, निवासी सोसायटय़ांमध्ये भेटीगाठी, बैठका यावर भर दिला आहे. अनेक उमेदवार मंदिरे, विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे, बौद्धविहार, दर्गा येथे जाऊन दर्शन, प्रार्थना करीत आहेत.
सुट्टय़ांचा लाभ घेऊन थेट जनसंपर्क
शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्टय़ांची पर्वणी साधून मुंबईतील विविध पक्षांचे उमेदवार प्रचारसभांपेक्षा थेट मतदारांशी संपर्क संपर्क साधण्यावर भर देणार आहेत. प्रमुख राजकीय पक्षांचे अनेक उमेदवार सोमवारी निवडणूक कार्यालयात जाऊन अर्ज दाखल करणार असून मिरवणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. कारण मुंबईतील उमेदवारी अर्ज भरण्याची डेडलाइन 9 एप्रिल आहे. तापत्या उन्हाचा कडका ओसरला की मुंबईत प्रचाराचा धुरळा मोठय़ा प्रमाणात उडणार आहे.
गजानन कीर्तिकर यांच्या प्रचाररथाचे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उद्घाटन
मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचाररथाचे उद्घाटन जोगेश्वरीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयासमोरील चौकात उद्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्ताला 6 एप्रिलला सकाळी 10.30 वाजता होणार आहे. या सोहळय़ाला महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित राहतील, अशी माहिती युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांनी दिली. 7 एप्रिलपासून शिवसेना उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचाराचा धडाका सुरू होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.





























































